बचाव पक्षही हजर करणार साक्षीदार
By Admin | Updated: July 29, 2015 03:00 IST2015-07-29T03:00:12+5:302015-07-29T03:00:12+5:30
बहुचर्चित युग चांडक अपहरण-खून खटल्यात बचाव पक्ष आपले साक्षीदार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात

बचाव पक्षही हजर करणार साक्षीदार
युग चांडक अपहरण-खून खटला
नागपूर : बहुचर्चित युग चांडक अपहरण-खून खटल्यात बचाव पक्ष आपले साक्षीदार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात उपस्थित करून त्यांची साक्ष नोंदवणार आहेत.
आरोपी राजेश दवारे याचे वकील अॅड. प्रदीप अग्रवाल यांनी दोन साक्षीदारांची नावे न्यायालयाला दिली असून बुधवारी आरोपी अरविंद सिंग याचे वकील अॅड. मनमोहन उपाध्याय हे आपल्या चार साक्षीदारांच्या नावांची यादी न्यायालयाला सोपविणार आहेत. बचाव पक्षाच्या साक्षीदारांची साक्ष ३ आॅगस्ट रोजी नोंदवली जाणार आहेत.
या पूर्वीच सरकार पक्षाच्यावतीने ५० साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या आहेत. हा खटला अंतिम टप्प्यात आहे. बचाव पक्षाच्या साक्षी नोंदवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद होईल. त्यानंतर खटल्याचा निकाल लागेल. निकाल आॅगस्टमध्ये लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी, फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्या वतीने अॅड. राजेंद्र डागा, अॅड. मनोज दुल्लरवार, आरोपींच्यावतीने अॅड. प्रदीप अग्रवाल, अॅड. मनमोहन उपाध्याय, अॅड. प्रमोद उपाध्याय आणि अॅड. राजेश्री वासनिक काम पहात आहेत.(प्रतिनिधी)