मनपा क्रीडा साहित्य घोटाळ्यात १०९ जणांविरुद्ध आरोप निश्चित

By Admin | Updated: August 25, 2016 02:18 IST2016-08-25T02:18:42+5:302016-08-25T02:18:42+5:30

नागपूर महानगरपालिकेतील २००० ते २००२ मध्ये गाजलेल्या कोट्यवधीच्या ....

Defamation charges against 10 people in NMC Sports | मनपा क्रीडा साहित्य घोटाळ्यात १०९ जणांविरुद्ध आरोप निश्चित

मनपा क्रीडा साहित्य घोटाळ्यात १०९ जणांविरुद्ध आरोप निश्चित

मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात चालणार खटला : १७ सप्टेंबरपासून सुनावणी
नागपूर : नागपूर महानगरपालिकेतील २००० ते २००२ मध्ये गाजलेल्या कोट्यवधीच्या क्रीडा साहित्य घोटाळा प्रकरणी खटल्याच्या सुनावणीस मुख्य न्यायदंडाधिकारी डी. पी. रागीट यांच्या न्यायालयात १७ सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून घोटाळ्यातील आरोपीविरुद्ध आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया प्रारंभ झाली. ही प्रकिया बुधवारी पूर्ण झाली. आतापर्यंत १०९ जणांविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले.

या घोटाळ्यात भाजपचे काही तत्कालीन नगरसेवक आणि मनपा अधिकारी, अशा १२० जणांचा समावेश होता. त्यापैकी ७ आरोपी मरण पावले आहेत. या आरोपींपैकी दोघे विद्यमान आमदार आणि ३० जण सध्या नगरसेवक आहेत. आरोप निश्चित झालेल्यांमध्ये तत्कालीन क्रीडा अधिकारी साहेबराव राऊत, आशा बनारसी, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, माजी महापौर कल्पना पांडे, अर्चना डेहणकर, विक्रम पनकुले, रमेश सिंगारे, अनिल धावडे, मिलिंद गाणार, रज्जन चावरिया, बंडू पारवे, यशवंत मेश्राम, राजू बहादुरे, किशोर गजभिये, प्रमोद पेंडके यांचा समावेश आहे.
२००० मध्ये क्रीडा साहित्य घोटाळ्याची तक्रार करण्यात आली होती. सप्टेंबर २००१ मध्ये राज्यातील काँग्रेस सरकारने मनपा बरखास्त केली होती. त्यावेळी टी. चंद्रशेखर यांना प्रशासक नेमण्यात आले होते. या घोटाळ्याची चौकशी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नंदलाल गुप्ता यांच्या समितीकडे सोपवण्यात आली होती. या समितीला अडीच कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा आढळून आला होता. त्यामुळे समितीच्या अहवालानुसार मनपा उपायुक्त रिझवान सिद्धीकी यांनी नोंदवलेल्या तक्रारीवरून १२० जणांविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात भादंविच्या ४२०, ४६८, ४७१ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घोटाळ्याचा तपास शहर गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. पी. चव्हाण हे या घोटाळ्याचे तपास अधिकारी आहेत. आज न्यायालयात आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे आणि बरेच आजी-माजी नगरसेवक आरोपी म्हणून उपस्थित होते. त्यांचे वकील अ‍ॅड. उदय डबले, अ‍ॅड. सुभाष घारे, अ‍ॅड. परिक्षित मोहिते, अ‍ॅड. लुबेश मेश्राम न्यायालयात उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Defamation charges against 10 people in NMC Sports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.