दीपक बजाज यांचा जामीन फेटाळला
By Admin | Updated: December 5, 2015 09:09 IST2015-12-05T09:09:29+5:302015-12-05T09:09:29+5:30
भ्रष्टाचाराच्या मार्गाने कोट्यवधीची अपसंपदा जमविल्याप्रकरणी जरीपटक्याच्या सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूलचे मुख्याध्यापक ...

दीपक बजाज यांचा जामीन फेटाळला
विशेष न्यायालय : कोट्यवधीचे अपसंपदा प्रकरण
नागपूर : भ्रष्टाचाराच्या मार्गाने कोट्यवधीची अपसंपदा जमविल्याप्रकरणी जरीपटक्याच्या सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूलचे मुख्याध्यापक दीपक खूबचंद बजाज यांचा जामीन अर्ज शुक्रवारी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ सप्टेंबर २०१५ रोजी दीपक बजाज आणि त्यांच्या पत्नी वीणा बजाज यांच्याविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१)(ड) (ई), १३ (२) आणि भादंविच्या ४०६, ४२०, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामिनाची लढाई हरल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाने एसीबीकडे शरण जाण्याचा आदेश दिल्याने दीपक बजाज यांनी १२ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांपुढे शरणागती पत्कारली होती. त्यानंतर त्यांना रीतसर अटक करण्यात आली होती.
एसीबीने दीपक बजाज यांचा एकूण १३ दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड घेतलेला आहे. सध्या ते कारागृहात न्यायालयीन कोठडी रिमांडमध्ये आहेत. बजाज यांच्या जामीन अर्जावर बचाव आणि सरकार पक्षाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला.
प्रकरण गंभीर असल्याने त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त मुख्य जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे, अतिरिक्त सरकारी वकील गिरीश दुबे यांनी तर आरोपीच्या वतीने ज्येष्ठ वकील अॅड. सुनील मनोहर, अॅड. कैलाश डोडानी, अॅड. अक्षय नाईक, अॅड. कमल सतुजा यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)
पहिल्याच घर झडतीत आढळले १८ लाख
डॉ. दीपक बजाज यांनी गैरमार्गाने जमवलेली अपसंपदा त्यांचे जरीपटका के.सी. बजाज मार्गावरील महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूल परिसरातील साईकृपा या प्रिन्सिपल बंगलोमध्ये ठेवलेली आहे, अशा गुप्त माहितीच्या आधारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजीव जैन यांनी न्यायालयाकडून रीतसर घरझडती वॉरंट प्राप्त करून आपल्या पथकासह २४ सप्टेंबर २०१५ रोजी धाड घातली होती. घर झडतीत १८ लाख १५ हजार ४९३ रुपये रोख आढळून आले होते. या रकमेपैकी १६ लाख ९० हजार ९७८ रुपये बजाज यांच्या घरी, १ लाख ५ हजार ५५० रुपये संस्थेच्या लिपीक कार्यालय आणि स्टाफ रुममधून आणि १८ हजार ९४० रुपये वीणा बजाज यांच्या कार्यालयातून जप्त करण्यात आले होते. या अपसंपदेबाबत बजाज यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पदाचा दुरुपयोग, तीन कोटी मिळवले
दीपक बजाज हे सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि त्यांच्या पत्नी वीणा बजाज ह्या अध्यक्षा आहेत. मुलगी डिम्पी बजाज ही सहायक शिक्षिका आहे. दीपक बजाज यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून ३ कोटी १० लाख ५५ हजार १४६ रुपये प्राप्त केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यापैकी १ कोटी ५६ लाख ७ हजार १२८ रुपये विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य डोनेशन घेऊन आणि भ्रष्ट मार्गाने शिक्षकांच्या नेमणुका करण्यात प्राप्त करण्यात आलेले आहे.