दीपक बजाज यांना पोलीस कोठडी

By Admin | Updated: November 14, 2015 03:02 IST2015-11-14T03:02:54+5:302015-11-14T03:02:54+5:30

भ्रष्टाचाराच्या मार्गाने कोट्यवधीची अपसंपदा जमविल्याप्रकरणी विशेष अवकाशकालीन न्यायालयाचे न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या न्यायालयाने ...

Deepak Bajaj gets the police cell | दीपक बजाज यांना पोलीस कोठडी

दीपक बजाज यांना पोलीस कोठडी

न्यायालय : प्रकरण कोट्यवधीच्या अपसंपदेचे
नागपूर : भ्रष्टाचाराच्या मार्गाने कोट्यवधीची अपसंपदा जमविल्याप्रकरणी विशेष अवकाशकालीन न्यायालयाचे न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या न्यायालयाने जरीपटक्याच्या सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि महात्मा गांधी सेन्टेनियल सिंधू हायस्कूलचे मुख्याध्यापक दीपक खूबचंद बजाज यांना २४ नोव्हेंबरपर्यंत ११ दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामिनाची लढाई हरल्याने दीपक बजाज यांनी गुरुवारी रात्री ९.५५ वाजताच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांपुढे शरणागती पत्कारली होती.
त्यांना रीतसर अटक केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी मेयो इस्पितळात नेले होते. त्यांचा वैद्यकीय तपासणी अहवाल उत्तम होता.

दीपक बजाज यांना पोलीस कोठडी
नागपूर : शुक्रवारी तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक किशोर सुपारे आणि पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांनी विशेष अवकाशकालीन न्यायालयात आरोपी दीपक बजाज यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर डॉ. अर्नेजा यांच्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यास आम्ही असमर्थ आहोत, असे सांगितले. त्यांनी मेयो इस्पितळातील आणि अर्नेजा इस्पितळातील बजाज यांचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केला. या दोन्ही अहवालात बरीच तफावत असल्याचे निदर्शनास येताच आरोपीला कोणत्याही स्थितीत न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दीपक बजाज यांनी एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे छातीत दुखत असल्याचे तक्रार करून रामदासपेठ येथील डॉ. अर्नेजा यांच्या इस्पितळात नेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांना लागलीच या इस्पितळात नेण्यात आले असता त्यांना तातडीने भर्ती करून घेण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे उपचार करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून एसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते. (प्रतिनिधी)

धाडीत हाती लागले मोठे घबाड
बजाज यांनी गैरमार्गाने जमवलेली अपसंपदा त्यांचे जरीपटका के.सी. बजाज मार्गावरील महात्मा गांधी सेंटिनियल सिंधू हायस्कूल परिसरातील साईकृपा या प्रिंसिपल बंगलोमध्ये ठेवलेली आहे, अशा गुप्त माहितीच्या आधारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजीव जैन यांनी न्यायालयाकडून रीतसर घरझडती वॉरंट प्राप्त करून आपल्या पथकासह २४ सप्टेंबर २०१५ रोजी धाड घातली होती. दीपक बजाज यांचे निवासस्थान, शाळा कार्यालय, सोसायटी कार्यालय आणि इतर परिसराच्या झडतीत १८ लाख १५ हजार ४९३ रुपये रोख, २ कोटी ६९ लाख १० हजार ३६५ रुपये किंमतीचे घरगुती सामान, अशी एकूण २ कोटी ८७ लाख २५ हजार ८५८ रुपये किंमतीची स्थावर व जंगम मालमत्ता आढळून आली होती. एसीबीच्या पथकाने २९ सप्टेंबर रोजी पुन्हा सिंधू एज्युकेशन सोसायटीचे कार्यालय, सिंधू एज्युकेशन कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे कार्यालय तसेच कार्यालय परिसरातील प्रिटिंग प्रेसची पुरावे गोळा करण्याच्या हेतूने झडती घेतली असता पतसंस्थेच्या गुप्त लॉकरमध्ये १३ लाख ८६ हजार ६१६ रुपयांची रोख रक्कम आढळून आली होती.

पगार केवळ ७७ हजार
महात्मा गांधी सेंटिनियल हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून दीपक बजाज हे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून मासिक ७६ हजार ७३३ रुपये पगार घेत होते. ते आपल्या पदाचा दुरुपयोग करून सिंधू एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून अनेक वर्षांपासून विविध स्वरूपाची शुल्क आकारणी करून तसेच शिक्षकांचा मूळ पगार दडपून कमी पगार देत होते. सर्व शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून नोकरीसाठी मोठ्या प्रमाणावर देणगीच्या स्वरूपात लाच घेत होते.

बजाज जामिनाची लढाई हरले सर्वोच्च न्यायालयापर्यंत
दीपक बजाज आणि त्यांची पत्नी वीणा बजाज यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१) (ड) (ई), १३ (२) आणि भादंविच्या ४०६, ४२०, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. वीणा बजाज ह्या सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आणि ओंकारलाल सिंधू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आहेत. त्यांना या प्रकरणात ६ आॅक्टोबर २०१५ रोजी अटक करण्यात आली होती. त्यांनी तपासात एसीबीला कोणतेही सहकार्य केले नसल्याचे तपास अधिकाऱ्यांची म्हणणे आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून दीपक बजाज हे अटक टाळण्याचा सतत प्रयत्न करीत होते. सर्वात आधी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो २८ सप्टेंबर रोजी फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. १४ आॅक्टोबर रोजी याही न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. ती २ नोव्हेंबर २०१५ रोजी फेटाळण्यात आली.

शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पगारातून जमवले ७८ लाख
बजाज दाम्पत्याने जानेवारी २०१३ ते आॅगस्ट २०१५ या काळात जरीपटक्याच्या महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू इंग्लिश प्रायमरी शाळेत कार्यरत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन १ कोटी ५६ लाख २६ हजार ४४४ रुपये होत असताना त्यांना केवळ ७८ लाख २४ हजार १५६ रुपये देऊन ७८ लाख २ हजार २८८ रुपये एवढी रक्कम हडप केली.

विद्यार्थ्यांचा पोषण आहार फस्त केला
एमजी हायस्कूल, ओंकारलाल सिंधू हायस्कूल आणि हिंदी प्रायमरी शाळेतील पाचवी ते आठव्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या एक वर्षाच्या काळात ४९ लाख ८७ हजार ५४३ रुपये या दाम्पत्याला प्राप्त झाले होते. त्यापैकी ४९ लाख ८० हजार ९१२ रुपये आहारावर खर्च झाल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्ष चौकशीत फारच कमी मुलांनी पोषण आहार ग्रहण केल्याचे आढळून आले.

मुलीच्या लग्नासाठी २२ लाख
दीपक बजाज यांनी आपली मुलगी डिम्पी दीपक बजाज ऊर्फ गुरविंदरसिंग कांदा हिच्या लग्नासाठी २२ लाख रुपये खर्च केले.
हा विवाह सोहळा आर्यभवन येथे पार पडला होता. बजाज यांच्याकडे चार आलिश्यान मोटारगाड्या आहेत. त्यांनी ‘चेहरा’ या चित्रपटाची ३ कोटी रुपये खर्च करून निर्मिती केली होती. बजाज दाम्पत्याने मोठ्या प्रमाणावर सोने आणि रोख दडवून ठेवल्याचा तपास अधिकाऱ्यांना संशय आहे.

बजाज कुटुंबाच्या बँक खात्यात पावणेतीन कोटी
खुद्द दीपक बजाज, वीणा बजाज आणि मुलांची एकूण ५५ बँक खाती असून या सर्व खात्यांमध्ये २ कोटी ८५ लाख ९९ हजार ७९३ रुपये आढळून आले आहे. या शिवाय ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स आणि स्टेट बँक आॅफ इंडिया येथे लॉकर्स आढळून आले आहेत.

विद्यार्थ्यांची ठेव रक्कमही हडपली
२००२ ते २००५ या काळात अ‍ॅडमिशनच्या नावाखाली बजाज दाम्पत्याने २३ लाख ६७ हजार २५० रुपये घेतले होते. त्यापैकी ९ लाख ६८ हजार रुपये पालकांना परत केले होते. १३ लाख ९९ हजार २५० रुपये अद्यापही परत केले नाही.

 

Web Title: Deepak Bajaj gets the police cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.