कोरोना संक्रमण घटूनही निर्बंधातून सुटका नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:35+5:302021-07-18T04:07:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या महिनाभरात नागपूर शहरातील कोविड संक्रमण नगण्य आहे. संक्रमण दर ०.५० टक्केच्या खाली आला ...

कोरोना संक्रमण घटूनही निर्बंधातून सुटका नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या महिनाभरात नागपूर शहरातील कोविड संक्रमण नगण्य आहे. संक्रमण दर ०.५० टक्केच्या खाली आला आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्याला सुरुवात झाल्यापासून संक्रमण ०.१५ टक्केच्या खाली कायम आहे. असे असतानाही नागपूर शहरातील निर्बंध कायम आहेत. याचा विचार करता निर्बंधांतून सुटका कधी होणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. स्थानिक प्रशासन आपल्या स्तरावर निर्णय घेत नाही. राज्य सरकारच्या निर्देशानुसार निर्बंध लागू ठेवण्याचे आदेश जारी केले जात आहेत. दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
कोरोनाची दुसरी लाट विचारात घेता मार्च अखेरीस निर्बंध कठोर करण्यात आले होते. परंतु नागपूर शहरातील २५ फेब्रुवारीपासून निर्बंध लागू करण्यात आले. गेल्या वर्षी संक्रमण वाढले असताना पाच महिने निर्बंधांना सामोरे जावे लागले. संक्रमण कमी झाल्याने रात्री ९ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याला परवानगी देण्याची मागणी व्यापारी वर्गाने केली आहे. जनजीवन रुळावर येण्यासाठी निर्बंध शिथिल करण्याची गरज आहे.
शहरातील संक्रमण दर
तारीख तपासणी पॉझिटिव्ह संक्रमण दर
८ जुलै ७१४४ १६ ०.२२
९ जुलै ४६३८ १३ ०.२९
१०जुलै ४४४५ १३ ०.२९
११ जुलै ६८८३ १९ ०.८
१२ जुलै ४१११६ १९ ०.४६
१३ जुलै ५०७७ १८ ०.३५
१४ जुले ६६५४ १६ ०.२४
१५ जुलै ५९३४ ०.९ ०.१५
१६ जुलै ५१९४ ०.५ ०.९
१७ जुलै ७१६४ १० ०.१३
....
निर्बंध कायम, सूट नाहीच
नागपूर जिल्ह्यात संक्रमण दर सातत्याने कमी होत असल्याने निर्बंध शिथिल होतील. अशी नागरिकांना आशा होती. परंतु जिल्हा व मनपा प्रशासनाने लोकांच्या आशेवर पाणी फेरले आहे. २६ जुलैपर्यंत निर्बंध कायम राहणार आहेत. जिल्हाधिकारी विमला आर व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी यासंदर्भात वेगवेगळे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार सुरू असलेले निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ४ पर्यंत दुकाने सुरू राहतील. शनिवार व रविवारी जीवनावश्यक वस्तू वगळून अन्य दुकाने बंद राहतील. जुने निर्बंध कायम राहतील.