कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:45 IST2021-02-05T04:45:17+5:302021-02-05T04:45:17+5:30
नागपूर : मागील चार दिवसांपासून दैनंदिन बाधितांची संख्या ३००वर गेली असताना सोमवारी त्यात घट होऊन २१८वर आली. ७ रुग्णांचे ...

कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा घट
नागपूर : मागील चार दिवसांपासून दैनंदिन बाधितांची संख्या ३००वर गेली असताना सोमवारी त्यात घट होऊन २१८वर आली. ७ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या १३४४९२ झाली असून मृतांची संख्या ४१६५ वर पोहोचली. नागपूर जिल्ह्यात आज कोरोना प्रतिबंधक लसीकरणात ३०५० पैकी २०६५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. ६७ टक्के लसीकरण झाले.
जिल्ह्यात गारठा वाढला आहे. सर्दी, खोकल्यासोबतच व्हायरलच्या रुग्णांत वाढ झाली आहे. परिणामी, कोरोनाची पुन्हा दहशत वाढताना दिसून येत आहे. मागील काही दिवसांत बाधितांची संख्या वाढल्याने चिंतेचे वातावरण होते. परंतु आज ३७०३ कोरोनाच्या तपासण्या झाल्यानंतर २१८ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला. आज बाधित रुग्णांमध्ये शहरातील १९८, ग्रामीण भागातील १७ व जिल्ह्याबाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ३, ग्रामीणमधील १ तर जिल्ह्याबाहेरील ३ मृत्यू आहेत. २९१ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १२७०७२ झाली असून याचे प्रमाण ९४.४८ टक्क्यांवर गेले आहे. सध्या ३२५५ रुग्ण उपचाराखाली आहेत.
-शहरात ८७ टक्के तर ग्रामीणमध्ये ४३.३ टक्के लसीकरण
शहरातील १७ केंद्रांना प्रत्येकी १०० नुसार १७०० लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ८७ टक्के म्हणजे, १४७९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. ग्रामीण भागातील १४ केंद्र मिळून १३५० लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ४३.४ टक्के म्हणजे, ५८६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. शहरात सर्वात कमी, १९ टक्के लसीकरण मेयोमधील केंद्रात झाले. तर सर्वाधिक, १७० टक्के लसीकरण ऑरेंज सिटी हॉस्पिटलमधील केंद्रात झाले.
-दैनिक संशयित : ३७०३
-बाधित रुग्ण : १३४४९२
_-बरे झालेले : १२७०७२
- उपचार घेत असलेले रुग्ण : ३८०८
- मृत्यू : ४१६५