नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; भाजपची सरकारला मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 21:06 IST2022-07-20T21:06:28+5:302022-07-20T21:06:57+5:30
Nagpur News राज्य सरकारने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी नागपूर जिल्हा भाजपाच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे.

नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; भाजपची सरकारला मागणी
नागपूर : जिल्ह्यात गत आठ दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम बुडाल्यात जमा आहे. त्यामुळे राज्य सरकारने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी नागपूर जिल्हा भाजपाच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंगळवारी याबाबतचे निवेदन ना. फडणवीस यांना सादर केले आहे. याप्रसंगी भाजपचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय पूर आणि मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात ज्यांची घरे पडली. पुरात जे नागरिक वाहून गेले, त्यांच्या कुटुंबांना सरकारने मदत करावी. पूरस्थितीमुळे जिल्ह्यात रस्ते आणि पुलाचे नुकसान झाले आहे. तिथे तातडीने दुरुस्ती करण्याचे प्रशासनाला आदेश देण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.