डिजिधन मेळाव्याचा करणार समारोप
By Admin | Updated: April 8, 2017 02:28 IST2017-04-08T02:28:42+5:302017-04-08T02:28:42+5:30
रोखरहित दिशेने यशस्वी वाटचाल करून डिजिटल अर्थप्रणालीला चालना देण्यासाठी नीती आयोगातर्फे

डिजिधन मेळाव्याचा करणार समारोप
नागपुरातून संपूर्ण देशात थेट प्रसारण : प्रधान सचिवांनी घेतला आढावा
नागपूर : रोखरहित दिशेने यशस्वी वाटचाल करून डिजिटल अर्थप्रणालीला चालना देण्यासाठी नीती आयोगातर्फे १०० व्या डिजिधन मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र्र मोदी उपस्थित राहणार असून नागपूर येथे १४ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १४ एप्रिल रोजीचा नागपूर येथील विविध कार्यक्रमासंदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी कौस्तुभ धवसे, नागपूर दूरसंचारच्या महाव्यवस्थापक नम्रता तिवारी, आर. श्रीनिवासन, निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.राव तसेच बँकांचे वरिष्ठ अधिकारी , विभाग प्रमुख उपस्थित होते.
केंद्रीय कॅबिनेट सचिव तसेच नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत तसेच विविध विभागांच्या केंद्रीय सचिवांनी नागपूर येथे आयोजित १०० व्या डिजिधन मेळाव्यासंदर्भात संपूर्ण राज्यांनी करावयाच्या उपक्रमाबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्याचे मुख्य सचिव, जिल्हाधिकारी यांच्या सोबत संवाद साधला.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १०० व्या डिजिधन मेळावा आयोजित करण्यात येणार असून या मेळाव्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र्र मोदी यांच्या हस्ते लकी ग्राहक योजनेमध्ये निवडण्यात आलेल्या ग्राहकांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. ग्राहकांची निवड राष्ट्रपती यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून करण्यात येणार आहे. यासोबतच डिजिधन व्यापार योजना अंतर्गत डिजिटल व्यवहार, इलेक्ट्रॉनिक पेमेंट यांचा वापर करणाऱ्या ग्राहक तसेच समाजातील गरीब व मध्यमवर्गीयांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोखरहित डिजिटल प्रणालीच्या वापराबाबत विविध स्तरावर प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
डिजिधन मेळाव्यासंदर्भात देशाचा रोडमॅप ठरविण्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मेळाव्यातील मार्गदर्शन देशातील सर्व ग्राम पंचायत, ब्लॉक पंचायत तसेच सर्व जिल्ह्यांपर्यंत थेट टेलिकास्ट करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तयारीचा आढावाही यावेळी घेण्यात आला. (प्रतिनिधी)