शंभरकर यांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्याचा निर्णय कायम; हायकोर्टाचा निवडणुकीत हस्तक्षेपास नकार
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: April 5, 2024 14:40 IST2024-04-05T14:38:52+5:302024-04-05T14:40:12+5:30
अपक्ष उमेदवार ॲड. पंकज शंभरकर यांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्याचा निर्णयही कायम ठेवला.

शंभरकर यांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्याचा निर्णय कायम; हायकोर्टाचा निवडणुकीत हस्तक्षेपास नकार
राकेश घानोडे. नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्याप्रमाणे नागपूर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ॲड. पंकज शंभरकर यांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्याचा निर्णयही कायम ठेवला.
प्रतिज्ञापत्राच्या प्रत्येक पानावर स्वाक्षरी केली नसल्यामुळे मनीषनगर येथील रहिवासी शंभरकर यांचे नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २८ मार्च रोजी रद्द केले. परिणामी, शंभरकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोंदविलेले सर्व आक्षेप २७ मार्च रोजीच दूर केले होते. असे असताना नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आले. त्यामुळे हा निर्णय अवैध ठरविण्यात यावा, असे त्यांचे म्हणणे होते.
याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार देऊन शंभरकर यांची याचिका निकाली काढली. तसेच, शंभरकर यांना निवडणूक संपल्यानंतर निवडणूक याचिका दाखल करण्याची मुभा देण्यात आली. शंभरकरतर्फे ॲड. राहुल हजारे यांनी कामकाज पाहिले.