तीनसदस्यीय पद्धतीचा निर्णय लोकशाही व जनविरोधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:09 IST2021-09-24T04:09:08+5:302021-09-24T04:09:08+5:30
नागपूर : तीन नगरसेवक प्रभाग पद्धत ही संविधानाने सर्वसामान्यांना मिळालेले प्रतिनिधित्वचे अधिकार अप्रत्यक्षपणे काढून घेणे आहे. यामुळे आपला ...

तीनसदस्यीय पद्धतीचा निर्णय लोकशाही व जनविरोधी
नागपूर : तीन नगरसेवक प्रभाग पद्धत ही संविधानाने सर्वसामान्यांना मिळालेले प्रतिनिधित्वचे अधिकार अप्रत्यक्षपणे काढून घेणे आहे. यामुळे आपला योग्य नगरसेवक निवडण्याची संधी मिळत नाही. आपल्या क्षेत्रात काम होईल किंवा नाही याची खात्री पण नाही. एकूणच आपला नाकर्तेपणा झाकण्याचा हा सर्व प्रस्थापित पक्षांचा कट आहे, अशी प्रतिक्रिया आपचे राज्य संयोजक रंगा राचुरे यांनी दिली आहे.
पूर्वी भाजपने केलेल्या ४ च्या प्रभाग पद्धतीप्रमाणेच स्थानिक नागरिकांना ‘आपला कुणीच वाली नाही’ ही भावना निर्माण करणारा ठरू शकतो. महाविकास आघाडीने यापूर्वी एक वॉर्डाचा निर्णय का घेतला? मुंबईला वेगळा निकष का? एक राज्य एक नियम का नाही? असे एक नाही अनेक प्रश्न जनतेसमोर निर्माण झाले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
-----------
- काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचाही विरोध
महापालिका निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीद्वारे घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी मागणी माजी मंत्री अनिस अहमद यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्रही लिहिले आहे. अहमद यांनी म्हटले आहे की, भाजप सरकारने राजजकारण करण्यासाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेतली; परंतु त्यामुळे शहर विकासाचे बारा वाजले. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा लोकांचा अनुभव चांगला नाही. त्यामुळे एकसदस्यीय प्रभाग पद्धतीचाच निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली.