‘लॉकडाऊन’चा निर्णय एकतर्फी, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:12 IST2021-03-13T04:12:25+5:302021-03-13T04:12:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘कोरोना’बाधितांचे आकडे वाढत असल्यामुळे उपराजधानीत ‘लॉकडाऊन’ लावण्याचा निर्णय पालकमंत्री नितीन राऊत यांनी घोषित केला. ...

‘लॉकडाऊन’चा निर्णय एकतर्फी, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’बाधितांचे आकडे वाढत असल्यामुळे उपराजधानीत ‘लॉकडाऊन’ लावण्याचा निर्णय पालकमंत्री नितीन राऊत यांनी घोषित केला. मात्र भाजपकडून यासंदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. इतका मोठा निर्णय घेण्याअगोदर भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवकांना विश्वासात घेण्यात आले नाही. हा निर्णय एकतर्फी असून शासन व प्रशासनाच्या गलथानपणाचा फटका जनतेला सहन करावा लागतो आहे, असा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. मात्र या बैठकीला भाजपचे लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हते. आम्हाला या बैठकीला बोलविण्यातच आले नाही. जनतेशी निगडित इतका मोठा निर्णय विश्वासात न घेता जाहीर करण्यात आला, असे आमदारांनी सांगितले.
लॉकडाऊन पर्याय नाही
मागील ‘लॉकडाऊन’पासून आता जनता सावरते आहे. अशास्थितीत पालकमंत्र्यांनी जनतेवर हा निर्णय लादला आहे. रुग्ण वाढत असताना पालकमंत्री समोर आले नाही. अधिकारी दालनांमध्येच बसून होते. अमरावतीमधील ‘लॉकडाऊन’ अयशस्वी ठरला. या निर्णयामुळे आता छोट्या व्यावसायिकांवर मोठे संकट आले आहे. ‘लॉकडाऊन’ हा काही पर्याय नाही.
- कृष्णा खोपडे, आमदार, पूर्व नागपूर
नियमांचे पालन व्हावे
कोरोनापासून कसेबसे सावरण्याच्या प्रयत्न करणाऱ्या व्यापारी व उद्योगासाठी हा लॉकडाऊन धक्कादायक आहे. नियमांचे पालन कसे व्हावे यावर प्रशासन व पालकमंत्र्यांनी भर देण्याची गरज होती. मात्र तसे झाले नाही. ‘लॉकडाऊन’ची घोषणा मागे घेऊन नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने पावले उचलायला हवी.
-आ. प्रवीण दटके, शहराध्यक्ष, भाजप
प्रशासनाने कामच केले नाही
नागपूर शहरात ‘लॉकडाऊन’ लावण्याचा निर्णय दुर्भाग्यपूर्ण आहे. आम्ही याचे समर्थन करीत नाही. वाहतूक खुली, ऑनलाईन मद्यविक्री खुली, शहर बंद आणि ग्रामीण भाग सुरू असे विचित्र नियम लावण्यात आले आहेत. मुळात प्रशासनाने गतीने कामच केले नाही. ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वाढविले नाही.
- गिरीश व्यास, आमदार, विधान परिषद
हा तर हेकेखोरपणाच
‘लॉकडाऊन’ लावण्याचा निर्णय हा अतिशय चुकीचा आहे. कठोर निर्णय घेणे आवश्यक होते, मात्र दंडाची रक्कम वाढवून लोकांना नियमांचे पालन करायला लावता आले असते. अगोदरच सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. आता परत ‘लॉकडाऊन’ लावल्याने संकट वाढेल. शिवाय यामुळे बाधितांची संख्या कमी होईल का, याबाबतदेखील शाश्वती नाही.
- संदीप जोशी, माजी महापौर
जनतेच्या हिताचा निर्णय भाजपला खुपतोय : पालकमंत्री
पालकमंत्री नितीन राऊत यांनी भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. जनतेच्या हितासाठी घेण्यात आलेला निर्णय भाजपा खुपतो आहे. नागरिकांचे प्राण वाचविणे याला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी कठोर पावले उचलण्यात येतीलच, असे त्यांनी स्पष्ट केले.