मिहानमध्ये उद्योगांना आकर्षित करण्यासाठीचे नवीन धोरण ठरवा : पालकमंत्र्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 12:02 AM2021-06-15T00:02:09+5:302021-06-15T00:02:40+5:30

Mihan, Nitin Raut लघु व मध्यम प्रकल्पातील उद्योगांना आकर्षित करण्यासाठीचे नवीन धोरण ठरवण्याची गरज आहे. यासाठी पावले उचलण्यात यावीत, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले.

Decide on a new strategy to attract industries in Mihan | मिहानमध्ये उद्योगांना आकर्षित करण्यासाठीचे नवीन धोरण ठरवा : पालकमंत्र्यांचे निर्देश

मिहानमध्ये उद्योगांना आकर्षित करण्यासाठीचे नवीन धोरण ठरवा : पालकमंत्र्यांचे निर्देश

Next
ठळक मुद्देमुंबई, दिल्लीत उद्योग संमेलन आयोजित करण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भाचे भविष्य बदलविण्याची क्षमता असलेला मिहान प्रकल्प पाठपुराव्याच्या उदासीनतेमुळे मागे राहता कामा नये. तेथे लघु व मध्यम प्रकल्पातील उद्योगांना आकर्षित करण्यासाठीचे नवीन धोरण ठरवण्याची गरज आहे. यासाठी पावले उचलण्यात यावीत, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले. सोमवारी मिहानमध्ये सुरू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महाराष्ट्र विमानतळ विकास तांत्रिक कंपनीचे तांत्रिक सल्लागार सुभाष चहांदे, मुख्य अभियंता एस. के. चॅटर्जी, मार्केटिंग मॅनेजर योगेश धारकर, जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी, नागपूर विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबीद रूही, विद्युत सल्लागार केशवराव इंगोले, मिहान एसईझेडचे विशेष अधिकारी दिनेश नानल, दीपक कुमार, मिहान इंडस्ट्रियल असोसिएशनचे मनोहर भोजवानी प्रामुख्याने उपस्थित होते. मिहानमध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवी दिल्ली, मुंबई येथे ‘एडव्हान्टेज विदर्भ’च्या धर्तीवर गुंतवणूक संमेलनाचे आयोजन करण्यात यावे. तसेच सागरी किनारपट्टीशिवाय यशस्वी झालेल्या अशा प्रकल्पांचा अभ्यास करून तसे पर्याय सुचवावे. मिहानसाठी आवश्यक असणाऱ्या १३३ केव्ही केंद्राच्या जागेचा प्रश्न पुढील दहा दिवसात निकाली काढण्यात यावा, असे निर्देश राऊत यांनी दिले.

हैदराबाद, मुंब्रा,इंदोर, विशाखापट्टणम यांच्यासह देशात ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकल्प उभे राहिले आहेत तेथील उपाययोजना मिहानमध्ये सुरू करण्यासाठी अभ्यास गट गठीत करा तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे आवश्यक विषयांवर बैठक लावण्यात यावी. या बैठकीमध्ये लघु उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना जागा देणे, कौशल्य विकास व प्रशिक्षण, नाईट पार्किंग, आंतरराष्ट्रीय विमान सेवा, ऑटोमोबाईल्स, लॉजिस्टिक क्षेत्रातील गुंतवणूक वाढ आदी विषयांवर धोरण ठरवता येईल, अशी सूचना राऊत यांनी केली.

सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार

मिहान हा विदर्भातील सर्वपक्षीय नेत्यांच्या पसंतीचा प्रकल्प असून यासाठी प्रसंगी आपण सर्वांशी चर्चा करू, असे नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. पुढील काही दिवसात मी यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व उद्योजकांची चर्चा करणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. मिहान संदर्भात दर पंधरा दिवसानंतर पाठपुरावा बैठक लावण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

बैठकीतील इतर मुद्दे

-कार्गो क्षेत्राचा विमानतळाशी संपर्क वाढावा यासाठी चार पदरी रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा

- बुटीबोरीला जोडण्यासाठी रेल्वे लाईनला समांतर आणखी एक फोर लेन मार्गिका निर्माण करण्यात यावी

- डाटाएन्ट्री इंडस्ट्रीला कायमस्वरूपी वीजपुरवठा देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा

- तीन गावातील पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यात यावा

Web Title: Decide on a new strategy to attract industries in Mihan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.