अपमानित जावयाची आत्महत्या
By Admin | Updated: September 26, 2016 03:08 IST2016-09-26T03:08:34+5:302016-09-26T03:08:34+5:30
लग्नसमारंभात सासरच्या मंडळींनी पाहुण्यांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ केल्यामुळे एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.

अपमानित जावयाची आत्महत्या
गळफास लावला : आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : लग्नसमारंभात सासरच्या मंडळींनी पाहुण्यांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ केल्यामुळे एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. संदीप रामदास तायडे(वय ३२, रा. पोलीस नगर, हिंगणा) असे मृताचे नाव आहे.
संदीप हा एमआयडीसीत एका कंपनीत काम करीत होता. त्याचे अमरावतीच्या तरुणीसोबत लग्न झाले होते. पत्नी किरकोळ मुद्यावरून वाद करून माहेरी जात होती. त्यामुळे संदीप वैतागला होता. त्याने पत्नीची समजूत काढतानाच सासरच्या मंडळीकडे दाद मागण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, सासरची मंडळी त्यालाच दोषी ठरवत होती. जुलै महिन्यात संदीपच्या साळीचे अमरावतीला लग्न होते. त्यासाठी तेथे तो गेला होता. ७ जुलैला त्याच्या सासुरवाडीतील मंडळींनी त्याचा भर पाहुण्यांसमोर पाणउतारा केला. त्याला टोचून बोलले. पत्नीनेही सोबत येण्यास नकार दिला. नातेवाईकांसमोर झालेला अपमान सहन न झाल्यामुळे गावाला परत आलेल्या संदीपने १७ सप्टेंबरला सकाळी ९.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.
तत्पूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात त्याने सासरच्या मंडळींनी कशाप्रकारे अपमान करून मानसिक त्रास दिला ते लिहिले. या मजकुरावरून संदीपच्या आत्महत्येला आरोपी इंदिरा धंदर (रा. अमरावती), त्यांचा जावई गोवर्धन ना. कांबळे (रा. वडगाव अमरावती) त्याची पत्नी (संदीपची अक्कडसासू) संगीता गोवर्धन कांबळे , चंद्रकांत मोहोड (रा. वरुड, अमरावती), संगीता चंद्रकांत मोहोड, रामदास धंदर, मंगला रमेश धंदर (रा. नागपूर) आणि इंदू नामक एक महिला (रा. भिलाई राजनांदगाव, छत्तीसगड) जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संदीपची आई बेबी रामदास तायडे (वय ५०) यांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.(प्रतिनिधी)