नवऱ्याने जाळलेल्या महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: November 18, 2015 03:17 IST2015-11-18T03:17:25+5:302015-11-18T03:17:25+5:30

ऐन दिवाळी पाडव्याला संशयखोर नवऱ्याने रॉकेल ओतून पेटविलेल्या अलका ऊर्फ पूजा अमित शर्मा (वय २६) या विवाहितेचा अखेर मृत्यू झाला.

The death of a woman burned by her husband | नवऱ्याने जाळलेल्या महिलेचा मृत्यू

नवऱ्याने जाळलेल्या महिलेचा मृत्यू

दारूने घेतला बळी : शर्मा विरुद्ध खुनाचा गुन्हा
नागपूर : ऐन दिवाळी पाडव्याला संशयखोर नवऱ्याने रॉकेल ओतून पेटविलेल्या अलका ऊर्फ पूजा अमित शर्मा (वय २६) या विवाहितेचा अखेर मृत्यू झाला. त्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी आरोपी अमित राधेश्याम शर्मा (वय ३७) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या सीताबर्डीत आरोपीचे वडिलोपार्जित दुकान आहे. मात्र दारूमुळे पुरता वाया गेलेला अमित व्यवसाय बुडवायला निघाल्याचे पाहून त्याच्या नातेवाईकांनी त्याला दुकानापासून वेगळे केले होते. आपले व्यसन भागवण्यासाठी आरोपी स्वत:च्या दुकानासमोर (फुटपाथवर) बेल्ट आणि चष्मे विकायला बसायचा. लग्न झाल्यावर तो सुधारेल, असे समजून कुटुंबीयांनी त्याचे अडीच वर्षांपूर्वी भाटापारा (छत्तीसगड) येथील पूजा ऊर्फ अलकासोबत लग्न लावून दिले. लग्नाच्या काही दिवसातच संशयखोर अमित छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद करून पत्नीला बदडत होता. सोशिक स्वभावाची अलका कुरबूर न करता दिवस काढत होती.
बुधवारी रात्री लक्ष्मीपूजन केल्यानंतर पारिवारिक प्रथेप्रमाणे गुरुवारी (१२ नोव्हेंबरला) सकाळी अलका आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्यासाठी बाजूच्या घरी गेली. सकाळी ९ ते ९.३० च्या सुमारास ती घरी परतली. वरच्या माळ्यावर घरचे काम करीत असताना आरोपी अमितने अलकाला ‘तुझा फोन आला, तू खाली ये’, असे सांगून खालच्या रूममध्ये बोलवले. तेथे तिला विनाकारण आरोप लावून मारहाण केली. ‘तुझ्यामुळे रोज घरात भांडणं होतात. तुझी आज कहाणीच खतम करतो’, असे म्हणत त्याने अलकाच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले आणि मुलीला उचलून बाहेरून दार बंद करीत पळून गेला. जळणाऱ्या अलकाच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यानी तिला विझवून सरळ मेयोत नेले. ७० टक्के जळालेल्या अलकाने मृत्यूशी तब्बल पाच दिवस झुंज दिली अन् सोमवारी सायंकाळी अखेर प्राण त्यागला. मृत्युपूर्वी अलकाने पोलिसांना दिलेल्या बयानावरून आरोपी अमित शर्मा याच्याविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

Web Title: The death of a woman burned by her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.