स्वाईन फ्लू मृत्यूचा आकडा शंभरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:16 IST2017-10-17T00:15:54+5:302017-10-17T00:16:21+5:30
एकीकडे सण-उत्सवाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र स्वाईन फ्लूने गंभीर रूप धारण केले आहे.

स्वाईन फ्लू मृत्यूचा आकडा शंभरावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे सण-उत्सवाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र स्वाईन फ्लूने गंभीर रूप धारण केले आहे. सोमवारी आणखी तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, नागपूर विभागात मृताचा आकडा १०४ वर पोहोचला आहे तर रुग्णांची संख्या ५५० झाली आहे.
सुरेखा बोपनवार (४२) रा. संत गाडगेबाबानगर चंद्रपूर, सरिता गंधारे (४३) रा. सत्यम्नगर पारडी व भूपेंद्र पांडे (६१) रा. छिंदवाडा अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही मृतांवर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरू होते. यांचा मृत्यू गुरुवारी झाला असला तरी त्याची नोंद उपसंचालक आरोग्य विभागाने सोमवारी घेतली. स्वाईन फ्लू मृताचा आकडा १०४ वर पोहोचल्याने सर्वाधिक मृतांच्या आकडेवारीत नागपूर विभाग तिसºया क्रमांकावर आले आहे.
शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार
आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले, स्वाईन फ्लूवरील आवश्यक औषधे सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत म्हणून आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला आहे.
सर्दी, खोकला, तापाकडे दुर्लक्ष नको
सर्दी, खोकला व ताप असेल तर तो अंगावर काढू नका किंवा स्वत:हून औषधे घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वाईन फ्लूच्या तत्काळ निदानाने औषधोपचाराचा चांगला प्रभाव पडतो. सण-उत्सवाचे दिवस असले तरी गर्दीच्या ठिकाणांपासून लहान मुलांना दूर ठेवायला हवे. सोबतच वारंवार हात धुणे, शिंकणाºया व खोकलणाºया व्यक्तीपासून दूर राहायला हवे. पुरेशी झोप घेणे व स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहे.
-डॉ. अविनाश गावंडे
सहयोगी प्राध्यापक, मेडिकल