बालिकेसह तीन रुग्णांचा मृत्यू
By Admin | Updated: March 10, 2015 02:28 IST2015-03-10T02:28:49+5:302015-03-10T02:28:49+5:30
गेल्या काही दिवसांपासून ऊन तापत असतानाही स्वाईन फ्लूची दहशत कमी होताना दिसून येत नाही.

बालिकेसह तीन रुग्णांचा मृत्यू
स्वाईन फ्लूचे पाच रुग्ण व्हेंटिलेटरवर : २४ तासात नऊ रुग्ण पॉझिटिव्ह
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून ऊन तापत असतानाही स्वाईन फ्लूची दहशत कमी होताना दिसून येत नाही. सोमवारी पुन्हा तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात दोन स्वाईन फ्लू संशयित तर शनिवारी मृत्यू झालेल्याची आज नोंद घेण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात संशयित म्हणून उपचार घेत असलेल्या अमरावती येथील १३ वर्षीय बालिकेचा ८ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता मृत्यू झाला. तिच्या नमुन्याचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. बुटीबोरी येथील २३ वर्षीय युवतीचा आज उपचारादरम्यान सायंकाळी मृत्यू झाला आहे. हिचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. मेयोमध्ये ७ मार्च रोजी मृत्यू झालेल्या ५२ वर्षीय महिलेची आज नोंद घेण्यात आली. ही महिला ताजबाग येथील रहिवासी असून तिचे आडनाव शेख असल्याचे सांगण्यात येते.
मेडिकलमधून पाठविण्यात आलेल्या एकाही संशयित रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल आज मिळाला नाही. मात्र, मेयोमध्ये एक, खासगी इस्पितळात एक, नागपूर जिल्ह्यात तीन, वर्धेत दोन, अकोला मंडळात एक तर मध्य प्रदेशातील एक असे नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या स्थितीत मेयो रुग्णायातील स्वाईन फ्लू वॉर्ड फुल्ल असून पाच रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत स्वाईन फ्लूच्या बळीची संख्या नागपूर विभागात ७६ झाली असून ३८५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यातील २१५ रुग्णांना उपचार देऊन घरी पाठविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)