चाकूहल्ल्यातील जखमीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:49 IST2021-02-05T04:49:20+5:302021-02-05T04:49:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. करण अशोक वर्मा (वय २६) असे मृताचे ...

चाकूहल्ल्यातील जखमीचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. करण अशोक वर्मा (वय २६) असे मृताचे नाव आहे. तो कळमन्यातील कटरे ले-आऊटमध्ये राहत होता. त्याची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव फैजान परवेज मंसूरी असून तो कळमन्यातील भवानीनगरात राहतो. क्षुल्लक कारणावरून ही घटना घडली.
आरोपी फैजान हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याजवळ नेहमीच शस्त्र असते. सुपारी आणि वादग्रस्त व्यवहारात तो दलालाची भूमिका वठवितो. हप्तावसुलीही करतो. गुरुवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास तो दुसऱ्या एकाची मोपेड घेऊन कळमना पोलीस चौकीजवळच्या दारूच्या भट्टीवर जात होता. तिकडून येत असलेल्या करणला त्याने दुचाकीचा कट मारला. त्यामुळे करणने त्याला हटकले असता आरोपी फैजानने त्याला शिवीगाळ करून चाकूने भोसकले. आजूबाजूची मंडळी धावल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. जखमी करणला कामठी मार्गावरील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला मध्यरात्रीच्या सुमारास मृत घोषित केले. रुग्णालयातून मिळालेल्या माहितीवरून कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नंतर आरोपी फैजानला अटक करण्यात आली.
---
वरिष्ठांनी करावी चाैकशी
गेल्या काही दिवसांपासून कळमना पोलीस ठाण्याचा कारभार चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणात प्रारंभी कळमना ठाण्यातील अधिकाऱ्यांनी हवालदाराकडून गुन्हा दाखल करून घेतला. यावेळी दिवसपाळी असलेले पोलीस ठाण्यातील अधिकारी (डे ऑफिसर) काय करीत होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरातील सराईत गुन्हेगारांवर सूक्ष्म नजर ठेवा. त्यांना वेळोवेळी चेक करा, असे स्पष्ट निर्देश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. असे असताना रेकॉर्डवरचा गुन्हेगार असलेला फैजान घातक शस्त्र घेऊन मोकाट कसा फिरत होता, असा प्रश्न विचारला जात आहे.
वरिष्ठांनी आरोपीची कसून चौकशी केल्यास दलाल, गुन्हेगार आणि हप्तेखोरांच्या मोठ्या नेटवर्कचा खुलासा होऊ शकतो.
-----