विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू
By Admin | Updated: January 5, 2017 02:28 IST2017-01-05T02:28:32+5:302017-01-05T02:28:32+5:30
कळमन्यातील चिखली कम्पाऊंड वॉलसाठी खड्डा खोदताना विजेचा धक्का लागून एका मजुराचा मृत्यू झाला,

विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू
नासुप्र कॉम्प्लेक्सचे बांंधकाम : कळमना चिखली येथील घटना
नागपूर : कळमन्यातील चिखली कम्पाऊंड वॉलसाठी खड्डा खोदताना विजेचा धक्का लागून एका मजुराचा मृत्यू झाला, तर त्याच्या भावासह तिघे जखमी झाले. ही घटना लपविण्यासाठी बांधकाम कंपनीने उशिरापर्यंत पोलिसांनाही याची माहिती दिली नाही. मीडियातील चर्चेनंतर पोलिसांना स्वत: पुढाकार घ्यावा लागला. परमेश यादन्ना देवराई (२७) असे मृताचे नाव आहे. तर त्याचा भाऊ व्यंकटेश देवराई (३२), राजू देवराई (२३) रा. साईनगर दिघोरी आणि सेवकदास झोडापे (४०) रा. राधानगर नरसाळा अशी जखमीची नवे आहेत.
चिखली येथे नागपूर सुधार प्रन्यासच्या कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू आहे. जे. बी. कन्स्ट्रक्शन कंपनीला बांधकामाचे कंत्राट मिळाले आहे. या ठिकाणी आठवडाभरापासून कम्पाऊंड वॉलचे काम सुरू आहे. दुपारी ४.३० वाजता येथे मजूर हॅन्ड पाईल(खड्डा खोदण्याचे उपकरण)ने खड्डा करीत होते. ज्या जागेवर खड्डा केला जात होता तिथे भूमिगत विजेचे केबल होते. मजुरांना याची कल्पना नव्हती. चौघेही हॅन्ड पाईलला पकडून खड्डा करीत होते. हॅन्ड पाईलमुळे विजेचे केबल कटल्याने विजेचा धक्का लागल्याची शंका वर्तविली जात आहे. परमेशचा भाऊ व्यंकटेश आणि त्याचा साथीदार सेवकदास एका झटक्यातच दूर फेकल्या गेले, तर परमेश आणि राजू हॅन्ड पाईलला चिकटले. आरडाओरड ऐकून इतर मजूर घटनास्थळी धावले. त्यांनी फावड्याच्या मदतीने राजूला हॅन्ड पाईलपासून वेगळे केले. परमेशलाही दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तोपर्यंत परमेशने जीव सोडला होता.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मजुरांच्या मते, सुपरवायझर शीतलप्रसाद पांडेय यांनी जे.बी. कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक पुरुषोत्तम रोहेरा यांना घटनेची माहिती दिली. यानंतर मजुरांना कमाल चौकातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून मेयो रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी परमेशला तपासून मृत घोषित केले. मजुरांनुसार ही घटना लपविण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. पोलीस नियंत्रण कक्ष आणि कळमना पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली नाही. पत्रकारांनी संपर्क साधला तेव्हा काही वेळासाठी कळमना पोलिसही हादरले. मेयो रुग्णालयातून घटनेची माहिती मिळाली. तेव्हा कळमना पोलिसांनी हालचाल केली. घटनास्थळाजवळच खासगी रुग्णालय आहे. तसेच मजुरांना थेट मेयो रुग्णालयातही नेण्यात येऊ शकले असते. असे असताना कमाल चौकातील खासगी रुग्णालयात नेण्याचे कारण काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.(प्रतिनिधी)
चप्पल ठरले मृत्यूचे कारण
मजुरांच्या माहितीनुसार काम करीत असताना सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले नव्हते. कंपनीचा सुपरवायझर खानापूर्ती म्हणूनच राहत होता. चप्पल घातली नसल्यानेच परमेशला जीव गमवावा लागला. चप्पल असल्याने त्याचे भाऊ आणि तीन मजुरांचा जीव वाचला. नासुप्र कॉम्प्लेक्सचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. सुरुवातीपासूनच येथे सुरक्षेचे कुठेलही पालन होत नसल्याचे मजुरांचे म्हणणे आहे.
पुन्हा एका मजुराचा मृत्यू
सेंट्रिंगचे काम करीत असताना पडून एका मजुराचा मृत्यू झाला. नित्यानंदा माखोम अधिकारी (४०) रा. कोलकाता असे मृत मजुराचे नाव आहे. मृत मजूर जगनाडे चौकातील नासुप्र बस टर्मिनलच्या नवनिर्मित इमारतीत काम करीत होता. मंगळवारी दुपारी १ वाजता सेंट्रिंगचे काम करीत असताना तो बोर्डवर उभा होता.