लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिप्टी सिग्नल परिसरात मोटारसायकस्वार तरुणाचा खड्यात पडल्याने मृत्यू झाल्याच्या प्रकरणामुळे राजकारण तापले होते. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांकडून तडकाफडकी रेल्वे, तसेच मनपा कंत्राटदाराविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला. मात्र, पोलिसांनी अपघाताची सीसीटीव्हीच्या माध्यमातून चौकशी केली असता भलताच प्रकार समोर आला. संबंधित तरुणाचा पारडी उड्डाणपुलावर अपघात झाला होता व त्याच्या वडिलांनी डिप्टी सिग्नल पुलाखाली घसरून अपघात झाल्याची खोटी तक्रार केली होती. या प्रकरणामुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एखादी तक्रार आली म्हणून तिची शहानिशा न करता गुन्हा नोंदविण्यात कसा काय आला, असा सवाल उपस्थित होत आहे.
महेंद्र संतकुमार फिंग (२४, जुना बाजार चौक, डिप्टी सिग्नल), असे मृताचे नाव आहे. त्याचे वडील संतकुमार फटिंग यांच्या तक्रारीनुसार १६ नोव्हेंबर रोजी रात्री ८:४० वाजता तो स्मॉल फॅक्टरी एरियातील त्याच्या बी. डी. आयर्न स्टील कंपनीतून काम आटोपून एमएच ४९-सीपी ५७४२ या क्रमांकाच्या मोटारसायकलने घरी निघाला होता.
डिप्टी सिग्नल रेल्वे क्रॉसिंगच्या नवीन पुलाच्या पोल क्रमांक ४ जवळून जात असताना तेथील खड्ड्यात पाणी साचले होते. खड्डा न दिसल्याने तो दुचाकीसह त्यात पडला. त्याच्या डोके, पोटाला मार लागून तो गंभीर जखमी झाला व त्याचा त्यानंतर मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हादेखील दाखल केला होता. मात्र, लकडगंज पोलिस ठाण्याच्या पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून संबंधित अपघात पारडी उड्डाणपुलावर झाल्याची बाब समोर आली. महेंद्रने समोरच्या वाहनाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतदेह व मोटारसायकल रामदेवबाबा इस्पितळात नेण्यात आले होते. पोलिसांनी साक्षीदारांनादेखील विचारणा केली; परंतु वडिलांनी दिलेल्या खोट्या माहितीच्या आधारे नागरिकांनी आंदोलन केल्याचेदेखील स्पष्ट झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत चांदेवार, साईनाथ रामोड, संदीप शिंदे, महेश जाधव, हितेश राठोड, प्रभाकर मानकर, प्रदीप गेडाम, सूरज मडावी यांच्या पथकाने हा तपास केला.
योग्य तपास करून करायला हवी होती कारवाई?
संबंधित अपघातानंतर डिप्टी सिग्नलच्या पुलाखाली तणाव निर्माण झाला होता. पोलिसांना तेथे धाव घ्यावी लागली होती. प्रकरण गंभीर होते. त्यामुळे योग्य तपास होऊन गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते; परंतु पोलिसांनी घाईघाईत गुन्हा दाखल केला व जेथे अपघातच झाला नाही तेथील कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृतकाच्या वडिलांच्या दाव्याची प्राथमिक शहानिशादेखील करण्याची तसदी पोलिसांनी का घेतली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. यासंदर्भात लकडगंज पोलिस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
महापालिकेने आता तरी धडा घ्यावा
दरम्यान, डिप्टी सिग्नल येथे अपघात झाला नसला तरी तेथील दुरवस्था व कामाच्या नावावर सुरू असलेली मनमानी समोर आली आहे. नागपुरात केवळ डिप्टी सिग्नलच नव्हे तर अनेक ठिकाणी कामाचे साहित्य रस्त्यांवर अस्ताव्यस्त असणे, कंत्राटदारांकडून बॅरिकेड्स न लावणे असे प्रकार दिसून येतात. यातून नेहमी गंभीर अपघाताचा धोका असतो. त्यामुळे मनपाच्या अधिकाऱ्यांनी आता तरी धडा घेण्याची आवश्यकता आहे.