जिवंत रुग्णाला दिले ‘डेथ सर्टिफिकेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:07 IST2021-04-11T04:07:21+5:302021-04-11T04:07:21+5:30
नागपूर : रुग्ण महिला जिवंत असताना नातेवाईकांच्या हाती ‘डेथ सर्टिफिकेट’ देऊन दुसऱ्याचा मृतदेह देण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी ८ ...

जिवंत रुग्णाला दिले ‘डेथ सर्टिफिकेट’
नागपूर : रुग्ण महिला जिवंत असताना नातेवाईकांच्या हाती ‘डेथ सर्टिफिकेट’ देऊन दुसऱ्याचा मृतदेह देण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास डोंगरगाव येथील आयजीपीए हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर्स कोविडालय’ या कोविड हेल्थ सेंटरमध्ये घडला. या प्रकरणाच्या विरोधात संतप्त नातेवाईक हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
रुग्णाचे नातेवाईक मनोज लिहीतकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, काशीनगर येथील रहिवासी, ६३ वर्षीय आशा मून या शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्या. कुटुंबात हा आजार पसरू नये म्हणून त्यांना डोंगरगाव येथील पूर्वीचे गायकवाड पाटील कॉलेज, तर आताचे कोविडालयात रात्री ११.३० वाजताच्या सुमारास भरती केले. भरती केल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी नातेवाइकांना घरी पाठविले. शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास रुग्णालयातून फोन आला. आशा मून यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती दिली. सर्व नातेवाईक रुग्णालयात पोहचले. तेथील कर्मचाऱ्यांनी आशा मून यांच्या नावाचे मृत्यूचे प्रमाणपत्र दिले. प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये असलेला मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले. नातेवाइकांनी मृतदेहाचा चेहरा दाखविण्याची अट घातली. बॅगमध्ये असलेला मृतदेह आपला नसल्याचे दिसताच नातेवाइकांनी मून यांना जिथे ठेवले होते तिथे धाव घेतली. त्या पलंगावर बसून होत्या. नातेवाइकांनी याच जाब विचारल्यावर तेथील बाउन्सरने सर्व नातेवाइकांना बाहेर काढले. रुग्णाला तेथून घरी पाठविले. या प्रकरणाची तक्रार करण्यास हिंगणा पोलीस ठाण्यात केल्याचेही लिहितकर यांनी सांगितले.
घाई गडबडीत हा प्रकार घडला
हॉस्पिटलचे संचालक मोहन गायकवाड यांनी सांगितले, घाई गडबडीत आणि शिफ्ट बदलण्याच्या वेळेत ही घटना घडली. संबंधित कर्मचाऱ्याने मृताची फाईल न आणता जिवंत रुग्णाची फाईल आणली. दुसऱ्या कर्मचाऱ्याने मृत्यूचे प्रमाणपत्र बनविले, तर निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याच्यावर स्वाक्षरी केली. मृतदेह देताना नातेवाईकांकडून ओळख पटविले जाते, त्यात मृतदेह त्यांचा नसल्याचे लक्षात आले. रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाचे शुल्क न भरताच रुग्णाला घेऊनही गेले.