वाघिणीच्या एका बछड्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:08 IST2021-03-15T04:08:10+5:302021-03-15T04:08:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात कॉलरवाली वाघिणीचा एक बछडा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतावस्थेत आढळून आला. उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यातील कऱ्हांडला ...

वाघिणीच्या एका बछड्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात कॉलरवाली वाघिणीचा एक बछडा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतावस्थेत आढळून आला. उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यातील कऱ्हांडला नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक १४१५ येथे ही घटना रविवारी (दि.१४) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
कऱ्हांडला प्रवेशद्वारापासून सुमारे एक किमी. अंतरावर सदर घटनास्थळ असून, नियमित गस्तीवर असताना वनरक्षकास मारून खाल्लेल्या अवस्थेत हा बछडा आढळून आला. सदर बछडा हा टी-१ वाघिणीचा असून, त्याचे अंदाजे वय ६-७ महिन्याचे आहे. टी-१ (कॉलरवाली) वाघिणीला तीन बछडे असून, अन्य दोन बछड्यांचाही शोध घेतला जात आहे. टी-१ वाघीण ही टी-९ (सूर्या) या वाघासोबत याच परिसरात फिरत असताना दिसून आली होती. घटनास्थळ परिसरात टी-९ या वाघाचेही प्रत्यक्ष दर्शन पर्यटकांना लाभले. याच वाघाने सदर बछड्यास मारले असावे, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.
टी-९ हा नर वाघ मागीलवर्षी ताडोबा येथून उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात दाखल झाला होता. तेव्हापासून त्याचा ठिय्या याच परिसरात दिसून येतो. मृतावस्थेत आढळून आलेला बछड्याची मान आणि पाय छिन्नविच्छिन्न अवस्थेत दिसून आले. रविवारी सकाळी गस्तीदरम्यान ही बाब उजेडात येताच या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारामुळे वन्यप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.