काळ्या बिबट्याचा अपघातात मृत्यू
By Admin | Updated: March 28, 2015 00:06 IST2015-03-27T22:29:32+5:302015-03-28T00:06:53+5:30
खिंडवाडीजवळ दुर्घटना : महामार्गावर पहाटे अज्ञात वाहनाने उडविले

काळ्या बिबट्याचा अपघातात मृत्यू
सातारा : दुर्मीळात दुर्मीळ मानला जाणारा काळा बिबट्या शुक्रवारी पहाटे महामार्गावर खिंडवाडीजवळ झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडला. हा बिबट्या नर जातीचा असून, अंदाजे २३ महिने वयाचा असल्याचे माहितगारांनी सांगितले. खिंडवाडी हे साताऱ्याचे प्रवेशद्वार असून, तेथेच बिबट्याचा अपघातात मृत्यू होण्याची घटना सव्वा वर्षात दुसऱ्यांदा घडली आहे.
पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या किंवा पाण्याच्या शोधात हा बिबट्या महामार्ग ओलांडून गेला असावा आणि अज्ञात वाहनाने त्याला पाठीमागून धडक दिली असावी, असा अंदाज आहे. धडक बसल्यावरही काही अंतर तो कसेबसे चालत गेला असावा आणि नंतर महामार्गाकडेला खोदलेल्या चरीत तो पडला असावा, असे दिसून आले. बिबट्याला कोठेही जखम झाली नव्हती, की रक्तही नव्हते. पाठीचे मणके निसटले असावेत, तसेच खुब्याचे हाड मोडले असावे, असा
प्राथमिक निष्कर्ष आहे.
साताऱ्याजवळ शुक्रवारी पहाटे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या काळ्या बिबट्याला शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले असता वन कर्मचाऱ्यांसह इतरांनाही मोबाईलवर त्याचे फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.