चित्रकाराचा मृत्यू पण ‘शो मस्ट गो आॅन’
By Admin | Updated: October 2, 2014 01:07 IST2014-10-02T01:07:56+5:302014-10-02T01:07:56+5:30
त्यांनी चित्रातून आयुष्याचा संघर्ष मांडला, अनेक सामाजिक विषयांना हात घालून संवेदनशील मनांना साद घातली, कधी निसर्गाच्या विविध रूपांनी त्यांना खुणावले तर कधी स्त्रीच्या अव्यक्त भावनाही त्यांनी

चित्रकाराचा मृत्यू पण ‘शो मस्ट गो आॅन’
प्रसिद्ध चित्रकार नितीन राळे यांचे निधन
नागपूर : त्यांनी चित्रातून आयुष्याचा संघर्ष मांडला, अनेक सामाजिक विषयांना हात घालून संवेदनशील मनांना साद घातली, कधी निसर्गाच्या विविध रूपांनी त्यांना खुणावले तर कधी स्त्रीच्या अव्यक्त भावनाही त्यांनी चित्रातून सूक्ष्मतेने अभिव्यक्त केल्या, त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाला जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत तीन दिवसांपूर्वीच प्रारंभ करण्यात आला. हे प्रदर्शन सुरूच आहे. दोन वळूंचे भांडण होत असतानाचे एक चित्र त्यांनी रेखाटले आहे. यात कोण जिंकणार, ते काहीच सांगता येत नाही. पण एका संवेदनशील चित्रकाराच्या श्वासांवर नियतीने त्यांच्या ५२ व्या वर्षीच डाव जिंकला. प्रसिद्ध चित्रकार नितीन राळे यांचे बुधवारी सकाळी ११ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पण स्वत:चे दु:ख लपवून रसिकांना कलाकृतीचा आनंद देणाऱ्या कलावंतांच्या आयुष्यात ‘शो मस्ट गो आॅन’ असतोच. यस्स...त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन सुरू आहे.
नितीन राळे बाबानानक सिंधी हिंदी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक होते. शाळेत विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. परीक्षा सुरू असतानाच त्यांना हृदयाचा त्रास झाला आणि त्यांचे निधन झाले. चित्रकार राळे यांनी लोट्स बुद्धा या संकल्पनेवरील बुद्धाचे चित्र प्रसिद्ध केले. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. जयकुमार जांभुळकर, अरविंद गजभिये, पुरुषोत्तम लिखार, अनिता धानी आणि राळे यांनी मिळून हा ग्रुप शो केला. या प्रदर्शनाला मिळालेल्या यशाने ते आनंदी होते. काल रात्री त्यांच्याशी दर्डा आर्ट गॅलरीत चित्रांवर मनमोकळी चर्चा झाली आणि आज त्यांच्या निधनाची बातमी आली. पण ते आमच्यासोबतच असल्यासारखे वाटते, असे यावेळी सर्व चित्रकारांनी सांगितले. नितीन राळे यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, बहीण आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. (प्रतिनिधी)