‘कॉफी विथ स्टुडंट्स’मध्ये ‘डीन’ची बोलती बंद

By Admin | Updated: June 28, 2014 02:39 IST2014-06-28T02:39:28+5:302014-06-28T02:39:28+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर, प्रश्नांवर थेट अधिष्ठात्यांनाच जाब विचारला.

'Dean' stopped talking in 'Coffee with Students' | ‘कॉफी विथ स्टुडंट्स’मध्ये ‘डीन’ची बोलती बंद

‘कॉफी विथ स्टुडंट्स’मध्ये ‘डीन’ची बोलती बंद

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर, प्रश्नांवर थेट अधिष्ठात्यांनाच जाब विचारला. त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर मिळत नसल्याचे पाहत, स्वत:च सडेतोड उत्तर देत वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकून घेतली. युवकांचे आपण नायक असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मेयो आणि मेडिकलमध्ये शुक्रवारी झालेल्या ‘कॉफी विथ स्टुडंट’मध्ये अधिष्ठात्यांची बोलती बंद असा एकतर्फी कार्यक्रम रंगला.
होस्टेलमध्ये स्वच्छता होत नाही, जागोजागी घाण साचलेली असते, सिवर व ड्रेनेज लाईन बुजलेल्या आहेत, यामुळे टॉयलेट, बाथरुम अस्वच्छ असतात, पाण्याची मुबलक सोय नाही. झोपायला पलंग नाहीत, गाद्या खराब झाल्या आहेत. एका छोट्या रूममध्ये चार-पाच विद्यार्थी असतात. वॉटर कुलर, दिवे, पंखे बंद स्थितीत आहेत, ग्रंथालयात पुरेशी पुस्तके नाहीत, रात्री ९ वाजतानंतर ग्रंथालयाला कुलूप लागते, अभ्यासाला बसण्यासाठीची बाकडी चांगली नाहीत, शैक्षणिक शुल्कातून व्यायाम शाळेसाठी पैसे घेतले जातात परंतु व्यायाम शाळा नावाचा प्रकारच नाही, सुरक्षा व्यवस्था योग्य नाही, असा प्रश्नांचा पाढाच ‘कॉफी विथ स्टुडंट’च्या माध्यमातून इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) विद्यार्थ्यांनी आज वाचला. विशेष म्हणजे या समस्या ऐकून आव्हाड यांनी, इतक्या प्राथमिक पातळीच्या पायाभूत सुविधा नसतील असे वाटले नव्हते. हे धक्कादायक आहे, असे म्हणत वारंवार आश्चर्य व्यक्त केले.
मेयोमध्ये चार तास
आव्हाड यांनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात मेयोमधून केली. दुपारी १२ वाजता त्यांनी आल्याआल्याच रुग्णालयाची पाहणी केली. बाह्यरुग्ण विभागात औषधांसाठी लागलेली रुग्णांची रांग त्यात खाली बसलेले रुग्ण पाहून आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी बसायला खुर्च्या-टेबल तरी द्या, अशा सूचना केल्या. एका महिला रुग्णाने पाचमधून फक्त दोन-तीन औषधे मिळत असल्याची तक्रार केली. आव्हाड यांनी डॉ. प्रवीण शिनगारे यांना तात्काळ औषधे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. काही रुग्णांनी पलंगावरील बेडशीट्स बदलविली जात नाही, डॉक्टर रुग्णांशी असभ्य वागतात, उपचारात हयगय होत असल्याच्या समस्या मांडल्या. तेथून ते मुख्य कार्यक्रमासाठी निघाले. यावेळी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्या आणि प्रश्नावर थेट डॉ. शिनगारे, डॉ. वाकोडे, बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता सुषमा साखरवाडे यांना उत्तरे देण्यास सांगितली. त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर मिळत नसल्याचे पाहत, २४ तासात होस्टेलमधील पाण्याची समस्या, ४८ तासात सुरक्षा गार्ड, पंखे, लाईटची समस्या सोडविण्याचे आदेश दिले.आव्हाड यांनी मुले आणि मुलींच्या होस्टेलला भेटी दिल्या. मुलांसोबत त्यांनी दुपारचे जेवणही घेतले.
रात्री १० पर्यंत पाहणी
मेयोनंतर दुपारी ४ .३० वाजतापासून आव्हाड यांनी मेडिकलच्या विद्याथ्याशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती वेळेवर हाती येईल अशी व्यवस्था करा, वैद्यकीय अभ्यासक्र मासाठीची केंद्रीय मूल्यांकन पद्धत बंद करा, रु ग्णालयातील कँटीन सुधारा, रु ग्णालयातील रिक्त जागा भरा, अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांनी मांडल्या. या समस्या लवकरात लवकर सोडविण्याच्या सूचना आव्हाड यांनी यावेळी उपस्थित अधिष्ठाता डॉ. राजराम पोवार, दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनय हजारे आणि साखरवाडे यांनी दिल्या. या मुख्य कार्यक्रमानंतर त्यांनी ओटीपीटीच्या इमारतीची पाहणी केली. होस्टेल क्रमांक चार, एकची पाहणी केली.
‘कपावरून’ आव्हाड नाराज
‘कॉफी विथ स्टुडंट’मध्ये कॉफीच्या कपावर महाविद्यालयाचा लोगो नाही म्हणून आव्हाड नाराज झाले. त्यांनी कार्यक्रम सुरू असताना थेट अधिष्ठात्यांना याचा विचारला जाब. आठ दिवसांपूर्वीच पत्र पाठवून सांगितले होते, अशी आठवण दिली.
पेपर १, २मध्ये सुटीची घोषणा
मेयोमध्ये एका विद्यार्थ्याने पेपर १ आणि २ मध्ये सुटी नसल्याने गुणांवर परिणाम पडतो.
याला घेऊन आव्हाड यांनी पेपर १ आणि पेपर २ मध्ये सुटी देण्यात येईल, अशी घोषणाच केली.(प्रतिनिधी)

Web Title: 'Dean' stopped talking in 'Coffee with Students'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.