अधिष्ठात्यांचे आदेश : ‘मोबाईल-रे’ची गंभीर दखल
By Admin | Updated: September 9, 2015 03:16 IST2015-09-09T03:16:30+5:302015-09-09T03:16:30+5:30
मेडिकलच्या क्ष-किरण विभागात फिल्मचा तुटवडा पडल्याने येथील डॉक्टर व तंत्रज्ञ मिळून ‘मोबाईल-रे’चे अजबच तंत्र शोधून काढले होते.

अधिष्ठात्यांचे आदेश : ‘मोबाईल-रे’ची गंभीर दखल
मेडिकलचे एक्स-रे झाले आॅनलाईन
नागपूर : मेडिकलच्या क्ष-किरण विभागात फिल्मचा तुटवडा पडल्याने येथील डॉक्टर व तंत्रज्ञ मिळून ‘मोबाईल-रे’चे अजबच तंत्र शोधून काढले होते. रुग्णांच्या जीवाशी चाललेला हा खेळ मंगळवारी ‘लोकमत’ने उघडकीस आणताच खळबळ उडाली. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी एक्स-रे चा मोबाईलवरून फोटो काढण्याचा प्रकार तत्काळ थांबविण्याचे निर्देश दिले, व स्वत: लक्ष घालत संगणकावरील एक्स-रे डॉक्टरांना आॅनलाईन पाहता येईल, अशी हेल्थ इन्फार्मेशन मॅनेजमेंट सिस्टीमही (एचआयएमएस) ची प्रणाली लागू केली, तसे लेखी आदेशही संबंधित विभागाला दिले.
मेडिकलला एक्स-रे फिल्म पुरवठा करणाऱ्या कंपनीचे सुमारे ३० लाखांचे बिल थकले आहे. यामुळे संबंधित कंपनीने फिल्म पुरवठा करण्यास नकार दिला आहे. परिणामी, एक्स-रे, एमआरआय आणि सिटी स्कॅनसाठी दिवसभरात लागणाऱ्या ५०० वर फिल्मच्याऐवजी मेडिकल प्रशासनाला स्थानिक पातळीवर सुमारे २०० फिल्म विकत घ्याव्या लागत आहे. यामुळे गंभीर रुग्णांचेच या मशीनवर निदान करून एक्स-रे ची फिल्म दिली जात आहे. हा प्रकार २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात व नुकत्याच झालेल्या २०१५च्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यानही घडला. विधान परिषदेत आमदार प्रकाश गजभिये यांनी यावर प्रश्नही उपस्थित केला होता. त्यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ही समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली होती. परंतु आजही रुग्णांचे हाल सुरू आहेत. नुकतेच मेडिकलच्या काही डॉक्टरांनी आणि क्ष-किरण केंद्राच्या डॉक्टरांनी मिळून अजबच तंत्र विकसित केले. रुग्णांच्या मोबाईलमध्ये संगणकावरील थेट ‘एक्स-रे’चा फोटो काढणे सुरू केले. ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांना एक्स-रे नाही, तर ज्यांनी मोबाईलमध्ये एक्स-रे चा फोटो काढला त्यावरच आजाराचे निदान करण्याचा धक्कादायक प्रकार सुरू केला. ‘लोकमत’ने मंगळवारी याचे सविस्तर वृत्त ‘एक्स-रे नव्हे मोबाईल-रे’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. याची दखल अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी घेऊन फिल्म तुटवड्यावर व ‘मोबाईल-रे’वर तोडगा म्हणून आॅनलाईन प्रणाली मंगळवारपासूनच लागू केली. (प्रतिनिधी)
डॉक्टरांच्या संगणकावर दिसेल ‘आॅनलाईन एक्स-रे’
क्ष-किरण विभागात डिजिटल रेडिओलॉजी मशीन उपलब्ध आहे. ही मशीन ‘एचआयएमएस’च्या प्रणालीशी जोडून सर्व डॉक्टरांना रुग्णांचा एक्स-रे संगणकावर पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात डॉक्टरांना संगणकावर केवळ रुग्णाचे नाव टाकायचे आहे. या प्रणालीमुळे महागडी फिल्म, रुग्णाचा मोबाईल वापरण्याची गरज नाही. विशेष म्हणजे, रुग्णाचा वेळ वाचून योग्य निदान होईल. ही सोय सिटी स्कॅन व एमआरआयसाठीही वापरली जाणार आहे.