पोलिसांच्या अंतिम अहवालावर निर्णयासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत
By Admin | Updated: July 6, 2015 02:58 IST2015-07-06T02:58:47+5:302015-07-06T02:58:47+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोंदिया येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाला संजय खोब्रागडे हत्याकांड ...

पोलिसांच्या अंतिम अहवालावर निर्णयासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत
हायकोर्ट : संजय खोब्रागडे हत्याकांड प्रकरण
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोंदिया येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाला संजय खोब्रागडे हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या नवीन अंतिम अहवालावर निर्णय घेण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत वाढवून दिली आहे.
३० जून २०१४ रोजी जेएमएफसी न्यायालयाने पोलिसांच्या अंतिम अहवालावरून सर्व आरोपींना आरोपमुक्त केले होते. गेल्या २५ मार्च रोजी उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द केला व याचिकाकर्त्यांना सुनावणीची संधी देऊन १२ जूनपूर्वी नव्याने निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. परंतु या कालावधीत निर्णय झाला नसल्यामुळे मुदत वाढवून देण्यात आली आहे. यासंदर्भात प्रदीप खोब्रागडे व दुर्गा रंगारी यांनी उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. संजय खोब्रागडे याचिकाकर्त्यांचे वडील होते. या प्रकरणावर आता ४ आॅगस्ट रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. ऋषिपाल टेंभरे, भाऊलाल हरीणखेडे, श्रीप्रकाश रहांगडाले, कुणाजी ठाकरे, हेमंत ठाकरे व माधुरी टेंभरे अशी आरोपींची नावे आहेत. खोब्रागडे यांचा बुद्धविहाराच्या जागेवरून पवार समाजातील लोकांसोबत वाद होता. यामुळे त्यांची हत्या करण्यात आली, असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. १६ मे रोजी मध्यरात्रीनंतर संजय खोब्रागडे यांना अंगावर पेट्रोल ओतून जाळण्यात आले होते. ते ९४ टक्के जळाले होते. गोंदिया येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. वरील आरोपी आरोपमुक्त झाल्यानंतर पोलिसांनी संजयची पत्नी देवकाबाई व राजू गडपायले यांना अटक केली. राजू व देवकाबाई यांनी स्वत:चे अनैतिक संबंध लपविण्यासाठी संजयची जाळून हत्या केली, असा पोलिसांना संशय आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. शशिभूषण वाहाणे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)