आयुष्याच्या सायंकाळी पदव्युत्तर शिक्षणाचा अरुणोदय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:08 IST2021-03-08T04:08:05+5:302021-03-08T04:08:05+5:30

योगेश पांडे महिला दिन विशेष नागपूर : वयाची साठी ओलांडली की आयुष्य एका ठरावीक चौकटीत अडकून जाते. मात्र, त्यांनी ...

The dawn of postgraduate education in the evenings of life | आयुष्याच्या सायंकाळी पदव्युत्तर शिक्षणाचा अरुणोदय

आयुष्याच्या सायंकाळी पदव्युत्तर शिक्षणाचा अरुणोदय

योगेश पांडे

महिला दिन विशेष

नागपूर : वयाची साठी ओलांडली की आयुष्य एका ठरावीक चौकटीत अडकून जाते. मात्र, त्यांनी या चौकटीबाहेर येऊन स्वत:ला सिद्ध करण्याचा संकल्पच घेतला. अनेक अडचणी आल्या, प्रसंगी शारीरिक व्याधींचे अडथळेदेखील आले. मात्र, त्या डगमगल्या नाहीत. दृढनिश्चयाच्या आधारावर विद्येच्या अवकाशात भरारी घेण्यासाठी पंखांमध्ये नवे बळ एकत्रित केले अन् यशाचे शिखर गाठले. अगोदर पदवीचा टप्पा ओलांडला अन् आता ‘पोस्ट ग्रॅज्युएट’ म्हणून स्वत:ची ओळख प्रस्थापित करण्याकडे मार्गक्रमण सुरू आहे. प्रतापनगरात राहणाऱ्या आरती मुखर्जी यांनी आयुष्याच्या सायंकाळी आपल्या जिद्दीच्या पावलातून हजारो महिलांसमोर प्रेरणावाट निर्माण केली आहे.

आरती मुखर्जी यांना मनातून इच्छा असूनदेखील कौटुंबिक कारणांमुळे पदवीचे शिक्षण घेता आले नाही. लग्नानंतर त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली व त्यात त्या व्यस्त झाल्या. मात्र, त्यांच्या मनात शिक्षणाची ओढ कायम होती. अखेरच्या क्षणामध्ये आईने त्यांना शिक्षण पूर्ण कर, असे सांगितले अन् आईचे हे शब्द पूर्ण करायचेच हा त्यांनी निश्चय केला. वयाची साठी ओलांडली होती. अशा स्थितीत आता शिक्षण कसे घ्यावे हा त्यांच्यासमोर यक्षप्रश्न होता. मात्र, कुणीतही ‘इग्नू’बाबत सांगितले आणि ३८ वर्षांनंतर बीए अभ्यासक्रमास प्रवेश घेत त्यांनी अभ्यासासाठी लेखणी हाती घेतली. ऐन परीक्षेच अगोदर किडनीची शस्त्रक्रिया झाली असतानादेखील त्यांनी अभ्यास करत परीक्षेत यश मिळविले. त्यानंतर त्यांनी ‘एम.ए.’ (समाजशास्त्र) अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. आता त्या अखेरच्या वर्षाला आहेत. त्यांना आता गुडघेदुखीचा त्रास असून त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र, माझ्या अभ्यासात खंड पडणार नसेल तरच शस्त्रक्रिया करा, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

महिलेनेच दिली हिंमत

‘इग्नू’त प्रवेश घेतला तेव्हा तेथील संचालक पी. शिवस्वरूप यांनी अगोदर प्रोत्साहन दिले. मात्र, उत्तरे लिहिताना माझे हात थरथरायचे. आत्मविश्वास हरवला होता. अशा स्थितीत रूपाली साखरे या समोर आल्या. माझ्या मुलीच्या वयाच्या असूनदेखील त्यांनी माझ्या अभ्यासावर प्रचंड मेहनत घेतली. रूपालीने दिलेल्या हिमतीमुळेच मी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तयारी करू शकत आहे, असे आरती मुखर्जी यांनी सांगितले.

उठा आणि शिक्षित व्हा

कौटुंबिक जबाबदारीमुळे अनेक महिला शिक्षणापासून वंचित राहतात. मात्र, शिक्षणाला वयाची मर्यादा नसते. मनात इच्छा असली तर दिव्यांगदेखील एव्हरेस्ट गाठू शकतात. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा निश्चय करा, उठा आणि शिक्षित व्हा. कारण महिला शिक्षित झाली तर ती समाजाला दिशा दाखवू शकते.

- आरती मुखर्जी

Web Title: The dawn of postgraduate education in the evenings of life