वासनकरच्या पत्नी व सासूला दणका
By Admin | Updated: January 29, 2015 01:04 IST2015-01-29T01:04:11+5:302015-01-29T01:04:11+5:30
गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा वासनकर वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत वासनकरची पत्नी भाग्यश्री व सासू कुमुद जयंत चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या

वासनकरच्या पत्नी व सासूला दणका
नागपूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा वासनकर वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत वासनकरची पत्नी भाग्यश्री व सासू कुमुद जयंत चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी बुधवारी दोघींनाही दणका देताना अर्जावरील प्रत्येक सुनावणीला व्यक्तीश: उपस्थित राहण्याचे निर्देश दिलेत. तसेच, या अटीसह त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करून शासनाला याप्रकरणी ६ फेब्रुवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले.
९ मे २०१४ रोजी लक्ष्मीनगर येथील विवेक पाठक यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी ९ आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६, ५०६, १२० (ब) आणि एमपीआयडी कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. २७ जुलै रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रशांत वासनकर, त्याचा भाऊ विनय वासनकर व साळा अभिजित जयंत चौधरी यांना अटक केली.
आरोपींनी वार्षिक ४० ते १५० टक्के व्याजाचे आमिष दाखवून मासिक, तिमाही, वार्षिक, द्विवार्षिक, १८ महिने, ३३ महिने, ४८ महिने, पर्क, लिक्विड अशा वेगवगळ्या आकर्षक योजनांतर्गत ठेवी स्वीकारल्या होत्या.
यानंतर मुदत संपूनही ठेवी परत केल्या नाहीत व परतावाही दिला नाही. आरोपींतर्फे अॅड. एम. बी. नायडू, तर शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश नायक यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)