मुलीला आईची जात नाकारली जाऊ शकत नाही : हायकोर्टाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:05 IST2019-07-09T00:01:00+5:302019-07-09T00:05:05+5:30
मुलीला आईची जात नाकारली जाऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी एका प्रकरणात दिला.

मुलीला आईची जात नाकारली जाऊ शकत नाही : हायकोर्टाचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलीला आईची जात नाकारली जाऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी एका प्रकरणात दिला.
न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष प्रकरणावर सुनावणी झाली. नुपूर भागवत हिने आईच्या जातीचे प्रमाणपत्र मिळावे याकरिता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिची याचिका मंजूर झाली. नुपूरची आई हलबा जातीची असून त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. विवाहानंतर एक वर्षाने नुपूरचा जन्म झाला. दरम्यान, नुपूरची आई पतीपासून विभक्त झाली. तेव्हापासून त्या नुपूरसोबत वेगळ्या राहात आहेत. नुपूरने हलबा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी आईच्या कागदपत्रांसह अमरावती येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला होता. परंतु, वडिलाची कागदपत्रे सादर केली नाही असे कारण देऊन तिचा अर्ज नामंजूर करण्यात आला. त्याविरुद्ध तिने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अपील केले होते. समितीनेही तिला दिलासा नाकारला व अपील खारीज करून उपविभागीय अधिकाऱ्याचा निर्णय कायम ठेवला. परिणामी, तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
उच्च न्यायालयाने नुपूरची बाजू योग्य ठरवली आणि उपविभागीय अधिकारी व जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे वादग्रस्त आदेश रद्द केले. तसेच, नुपूरच्या अर्जावर कायद्यानुसार विचार करून तिला आईच्या जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे असे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. अशा प्रकरणांमध्ये आईची कागदपत्रे स्वीकारून अपत्यांना आईच्या जातीचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे असे मत न्यायालयाने हा निर्णय देताना नोंदवले. याचिकाकर्तीतर्फे अॅड. अश्विन देशपांडे यांनी कामकाज पाहिले.