केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाला दत्तोपंत ठेंगडी यांचे नाव
By Admin | Updated: August 28, 2016 02:17 IST2016-08-28T02:17:58+5:302016-08-28T02:17:58+5:30
केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाला अखेर भारतीय मजदूर संघाचे संस्थापक व रा.स्व. संघाचे प्रचारक राहिलेले दत्तोपंत ठेंगडी यांचे नाव देण्यात आले आहे.

केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाला दत्तोपंत ठेंगडी यांचे नाव
श्रम मंत्रालयाची मंजुरी : दिल्ली येथील कार्यक्रमात घोषणा
निशांत वानखेडे नागपूर
केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाला अखेर भारतीय मजदूर संघाचे संस्थापक व रा.स्व. संघाचे प्रचारक राहिलेले दत्तोपंत ठेंगडी यांचे नाव देण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मागणीबाबतचा प्रस्ताव प्रलंबित होता. आता या मंडळाचे नाव दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार प्रशिक्षण व विकास मंडळ करण्यात आले आहे.
केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाची स्थापना १९५८ साली करण्यात आली होती. तेव्हापासून त्याचे मुख्यालय नागपूरला स्थापित करण्यात आले आहे. देशभरातील ५० विभागीय कार्यालय, ९ उपविभागीय कार्यालय आणि ६ झोनल कार्यालयाचे कार्य या मुख्यालयाअंतर्गत चालते. यासोबतच मुंबई येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ वर्कर्स एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून विविध शासकीय आणि खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे काम केले जाते. गेल्या काही महिन्यांपासून नागपूर येथील मुख्यालय दिल्लीला स्थानांतरित करण्याचा प्रयत्न केला जात होता. देशातील एक महत्त्वाची संस्था नागपुरात असल्याने ती स्थानांतरित होऊ नये यासाठी मुख्यालयातील कर्मचारी व विविध संघटनांनी विरोध केला. लोकमतने याबाबत पाठपुरावा केला आहे. त्यामुळे मुख्यालय नागपूरलाच राहणार असा निर्वाळा श्रममंत्र्यांनी दिला.
दत्तोपंत ठेंगडी यांचे नाव श्रमिक शिक्षाण मंडळाला देण्याचा प्रस्ताव अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. विशेष म्हणजे ठेंगडी हे विदर्भातीलच असल्याने आणि त्यांनी आजीवन कामगार हिताचे कार्य केल्याने त्यांचे नाव या मंडळाला देण्यात यावे अशी अनेकांची भूमिका होती. अनेकांनी या प्रस्तावावर आक्षेपही घेतला. मात्र अखेर श्रम मंत्रालयाने मंडळाला दत्तोपंत ठेंगडी यांच्या नावाला मंजुरी दिली. नुकताच नवी दिल्ली येथे झालेल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या उद््घाटन कार्यक्रमात श्रम मंत्रालयातर्फे नामकरणाची घोषणा करण्यात आली. यावेळी लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रय आदी उपस्थित होते.
दत्तोपंत ठेंगडी हे कामगार संघटनांच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये निर्विवाद मोठे व्यक्तिमत्त्व आहे. कामगारांच्या प्रश्नाबाबत बोलताना व लढताना त्यांच्या मनातील कळकळ नेहमी जाणवायची. हा अमूक पक्षाचा, संघटनेचा असा भेदभाव त्यांनी कधीही केला नाही. देशाच्या व कामगारांच्या हितासाठी कोणतेही चांगले काम करण्यास ते नेहमी पुढाकार घ्यायचे. त्यांनी अनेक लढे लढले आहेत. मात्र एवढी मोठी व्यक्ती असूनही त्यांच्यात असलेला साधेपणा अधिक महत्त्वाचा होता. त्यांच्याकडे आलेल्या व्यक्तीशी ते अतिशय नम्रपणे आणि प्रेमाने बोलत असत. श्रमिक शिक्षण मंडळाला त्यांचे नाव देणे अतिशय चांगला निर्णय आहे.
- अमर वझलवार, संचालक, विभागीय कामगार प्रशिक्षण समन्वय समिती, सीबीडब्ल्यूई
दत्तोपंत ठेंगडी यांचे कार्य
दत्तोपंत ठेंगडी यांचा वर्धा जिल्ह्यात १९२० साली जन्म झाला. त्यांनी नेहमीच कामगारांच्या हितासाठी कार्य केले आहे. विविध कामगार संघटनांचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. त्यांनी स्वदेशी जागरण मंच, भारतीय किसान संघ आणि भारतीय मजदूर संघाची स्थापना केली. इंटकच्या सचिवपदाचे कार्य त्यांनी सांभाळले. सोबतच रेल्वे, पोस्ट कामगार संघटनांमध्येही त्यांनी काम केले आहे. ठेंगडी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजीवन प्रचारक म्हणून कार्य केले आहे. १४ आॅक्टोबर २००४ ला त्यांचे निधन झाले.
काय म्हणतो कायदा
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने २००३ साली नाव देण्यासंदर्भात कायदा केला होता. या कायाद्यानुसार कोणत्याही राष्ट्रीय संस्थेचे एखादे ठोस कारण असल्याशिवाय नाव बदलविता येत नाही. ज्या व्यक्तीचे नाव संस्थेला द्यायचे असेल ती व्यक्ती राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली असावी व संबंधित संस्थेच्या कार्याशी ते जुळलेले असावे. हा नामबदलाचा प्रस्ताव संबंधित विभागाच्या मंत्र्यांच्या संमतीने कॅबिनेट सचिवामार्फत पंतप्रधान यांच्या मंजुरीसाठी देण्यात यावा आणि पंतप्रधानांच्या मंजुरीनंतरच नाव बदल करणे शक्य आहे.