दटके, तिवारी, हर्डीकर यांनी मागितली हायकोर्टाची क्षमा
By Admin | Updated: October 8, 2016 03:08 IST2016-10-08T03:08:33+5:302016-10-08T03:08:33+5:30
हनुमान चालिसा पठण व एडस् जनजागृती कार्यक्रमासंदर्भातील अवमानना प्रकरणात महापौर प्रवीण दटके,

दटके, तिवारी, हर्डीकर यांनी मागितली हायकोर्टाची क्षमा
नागपूर : हनुमान चालिसा पठण व एडस् जनजागृती कार्यक्रमासंदर्भातील अवमानना प्रकरणात महापौर प्रवीण दटके, मनपा सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची बिनशर्त क्षमा मागितली.
न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष प्रकरणावर सुनावणी झाली. दोन्ही कार्यक्रम घेताना न्यायालयाच्या आदेशाची अवमानना होईल अशी कोणतीही कृती जाणीवपूर्वक केली नाही. अनवधानाने काही चूक झाली असल्यास बिनशर्त क्षमा मागतो असे प्रतिज्ञापत्र तिघांनीही सादर केले.
न्यायालयाने त्यांचे स्पष्टीकरण ग्राह्य धरून संबंधित अवमानना याचिका निकाली काढली. नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी ही याचिका दाखल केली होती.
७ एप्रिल २०१६ रोजी कस्तूरचंद पार्क येथे हनुमान चालिसा पठण व एड्स जनजागृती हे दोन्ही कार्यक्रम एकत्र घेण्यात येणार होते. मून यांनी यावर आक्षेप घेऊन उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
न्यायालयाच्या दणक्यानंतर महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती कार्यक्रम तर, नगरसेवक दयाशंकर तिवारी व पोद्दारेश्वर राम मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान चालिसा पठण कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच, दोन्ही कार्यक्रम स्वतंत्रपणे होतील व एडस् जनजागृती कार्यक्रम संपल्यानंतर एक तासाने हनुमान चालिसा पठण कार्यक्रम घेण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली. यानंतर न्यायालयाने एड्स जनजागृती कार्यक्रम सुरू असताना हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचे तर, हनुमान चालिसा पठण कार्यक्रम सुरू असताना एड्स जनजागृती कार्यक्रमाचे बॅनर्स लावू नका असे स्पष्ट केले होते. या आदेशाचे पालन झाले नाही, असे मून यांचे म्हणणे होते.
याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अश्विन इंगोले तर, मनपातर्फे अॅड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)