सूरजनगरात समस्यांचा अंधार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:12 IST2021-03-04T04:12:38+5:302021-03-04T04:12:38+5:30

नागपूर : नागपूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. शहरातील नागरिकांना मेट्रो रेल्वेसारख्या सुविधा मिळत आहेत. परंतु पूर्व नागपुरातील सूरजनगरात ...

Darkness of problems in Surajnagar () | सूरजनगरात समस्यांचा अंधार ()

सूरजनगरात समस्यांचा अंधार ()

नागपूर : नागपूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. शहरातील नागरिकांना मेट्रो रेल्वेसारख्या सुविधा मिळत आहेत. परंतु पूर्व नागपुरातील सूरजनगरात मात्र नागरिकांना मूलभूत समस्यांपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. या भागात रस्ते, गडरलाईन, पाण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने या भागात नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

अपुरा पाणीपुरवठा

सूरजनगरात नळाला कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नळाला केवळ अर्धा तास पाणी येत असल्यामुळे नागरिकांना पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. नळही नियमित येत नसल्यामुळे नागरिकांना पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. परिसरात विहिरीही नसल्यामुळे नागरिकांची पंचाईत होते. वापरावयाच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. त्यामुळे महापालिकेने या भागात किमान दीड तास नळाला पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

रस्त्यांची अवस्था बिकट

सूरजनगर भागात भांडेवाडी डम्पिंग यार्डकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील गिट्टी उखडली असल्यामुळे वाहनचालकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. सूरजनगरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्थाही बिकट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. या भागातील रस्ते दुरुस्त करण्याची मागणी नागरिक अनेक दिवसापासून करीत आहेत. परंतु अद्यापही त्यांच्या मागणीकडे लक्ष देण्यात आले नाही.

गडरलाईनमुळे नागरिक त्रस्त

सूरजनगर ही खूप जुनी वस्ती आहे. परंतु या वस्तीत गडरलाईन नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. सेफ्टी टँक भरल्यानंतर वस्तीत घाण पाणी वाहते. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. गडरलाईन उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांनी अनेकदा नगरसेवकांना तसेच महापालिकेत निवेदने दिली. परंतु अद्यापही गडरलाईनची व्यवस्था करण्यात आली नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने गडरलाईनची व्यवस्था करून देण्याची नागरिकांची मागणी आहे. तसेच या भागात सफाई कर्मचारी येत नसल्यामुळे जागोजागी कचरा साचलेला दिसतो. महापालिकेने या भागात नियमित सफाई कर्मचारी पाठविण्याची गरज आहे. वस्तीला लागूनच डम्पिंग यार्डची भिंत आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या वस्तीजवळ डम्पिंग यार्डमधील कचरा न टाकण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

रस्त्यांची दुरुस्ती करावी

‘परिसरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्यामुळे रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करणे महत्त्वाचे आहे.’

- रंजना सुखदेवे, महिला

पुरेसे पाणी मिळावे

‘सूरजनगर भागात नळाला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. नळाला केवळ अर्धा तास पाणी येत असल्यामुळे पिण्याचे पाणीही मिळत नाही. त्यामुळे या भागात दीड तास पाणीपुरवठा करण्याची गरज आहे.’

- राम सामल, नागरिक

गडरलाईन नसल्यामुळे गैरसोय

‘गडरलाईन नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. सेफ्टी टँक भरल्यानंतर रस्त्यावरून तसेच वस्तीत घाण पाणी वाहते. त्यामुळे या भागात महापालिकेने गडरलाईनची व्यवस्था करणे गरजेचे आहे.’

- आशा बेले, महिला

धुळीमुळे नागरिक त्रस्त

‘भांडेवाडी डम्पिंग यार्डकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील गिट्टी उखडल्यामुळे वाहनचालकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करून नागरिकांना होत असलेला त्रास दूर करावा.’

- सारिका हरडे, महिला

नियमित सफाई व्हावी

‘सूरजनगर भागात सफाई कर्मचारी नियमित येत नाहीत. त्यामुळे परिसरात नेहमीच कचरा साचत असून, नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे महापालिकेने या भागात नियमित सफाई कर्मचारी पाठविण्याची व्यवस्था करावी.’

- सुरेखा शाहू, महिला

उच्च दाबाने पाणीपुरवठा करावा

‘नळाला कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळत नाही. त्यामुळे या भागात नळाची वेळ वाढवून उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे.’

- दरबारी नेताम, नागरिक

..............

Web Title: Darkness of problems in Surajnagar ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.