हिंदवीच्या अंधारलेल्या भविष्याला हवी आधाराची पणती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:08 IST2020-11-28T04:08:54+5:302020-11-28T04:08:54+5:30
आर्थिक चणचणीपोटी प्रवेश अडचणीत : वडिलांची मुलीच्या प्रवेशासाठी धडपड नागपूर : ९७ टक्के गुणांसह दहावीत उत्तीर्ण झालेल्या हिंदवी ...

हिंदवीच्या अंधारलेल्या भविष्याला हवी आधाराची पणती
आर्थिक चणचणीपोटी प्रवेश अडचणीत : वडिलांची मुलीच्या प्रवेशासाठी धडपड
नागपूर : ९७ टक्के गुणांसह दहावीत उत्तीर्ण झालेल्या हिंदवी राजेश विसपुते या विद्यार्थिनीला भविष्यात इंजिनिअर बनायचे आहे. पण आज तिच्या घरची आर्थिक परिस्थिती इतकी नाजूक आहे की तिच्याकडे कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठीसुद्धा पैसे नाहीत. वडिलांची मुलीच्या प्रवेशासाठी धडपड सुरू आहे, पण मदतीचे दार बंद झाल्याने ते हतबल झाले आहेत.
हिंदवीचे वडील राजेश विसपुते हे आंगठी बनविण्याचे कारागीर आहेत. नोटबंदीनंतर त्यांच्या व्यवसायावर अवकळा आली. त्यातच हॉलमार्किंग आल्याने आता कामच मिळत नसल्याने त्यांना घराचा गुजाराही करणे कठीण झाला आहे. हिंदवीची आई निकिता गृहिणी असून, त्याही लहानसा गृहउद्योग करून कुटुंबाचे दोन वेळेचे पोट भरेल यासाठी हातभार लावतात. घरात ६ लोकांचे कुटुंब, हाताला रोजगार नाही अशात मुलगी हुशार पण तिला शिकवायलाच पैसा नसल्याने नवरा-बायको दोघांच्याही चेहऱ्यावर निराशेची लकेर आहे.
काही संस्था व व्हाॅट्सअॅपवर व्हायरल होणारे काही नंबर जे शालेय विद्यार्थ्यांना मदत करतात, त्यांनाही संपर्क साधण्याचा राजेश विसपुते यांनी प्रयत्न केला. पण ते सर्व बोगस निघाले. कुठून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. नातेवाईक, मित्र यांच्याकडेही हात पसरले पण कोरोनाच्या काळात त्यांचीही परिस्थिती बेताची असल्याने त्यांनीही नकार दिला. मुलीच्या भविष्याच्या मार्गात अंधारच दिसत असल्याने ते हतबल झाले आहे.
- हिंदवीला हवाय मदतीचा हात
मुलगी हुशार आहे. तिच्या शिक्षणासाठी मदत व्हावी, अशी तिच्या वडिलांची अपेक्षा आहे. गुणवंत मुलीचे पैशासाठी शिक्षण थांबू नये, यासाठी समाजातून मदतीचे हात पुढे येण्याची गरज आहे. तिच्या अंधारलेल्या भविष्याला आधाराची पणती होण्यासाठी ९०६७०४७५३८ अथवा ९८२२६९०३६६ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. अन्यथा निकिता राजेश विसपुते यांच्या बँक ऑफ इंडियाच्या सीताबर्डी शाखेतील ८७६६१०११००१४९०३ या खात्यावर मदत करू शकता.