लग्न आले दारी, पैसा नाही घरी!
By Admin | Updated: November 11, 2016 03:14 IST2016-11-11T03:14:06+5:302016-11-11T03:14:06+5:30
लग्न आले दारी, पैसा नाही घरी, अशी अवस्था शास्त्रीनगरातील एका वडिलांची झाली आहे.

लग्न आले दारी, पैसा नाही घरी!
वधूचे वडील हतबल : नोटा रद्द झाल्याने लग्नकार्य अडचणीत
नागपूर : लग्न आले दारी, पैसा नाही घरी, अशी अवस्था शास्त्रीनगरातील एका वडिलांची झाली आहे. शुक्रवारी मुलीचे लग्न आहे. घरात पैसा असून ही त्याचा उपयोग होत नसल्याने, एका नियोजित वधूचे वडील हतबल झाले आहेत. मुलीच्या लग्नाच्या तोंडावर सरकारने हजार, पाचशेच्या नोटा बंद केल्याने, हा लग्न सोहळा कसा पूर्ण करावा, अशी चिंता त्यांना सतावत आहे.
भाऊराव काळे असे त्यांचे नाव असून, त्यांची मुलगी दिव्या हिचा शुक्रवारी लग्नसोहळा आहे. गुरुवारी तिला हळद लागली. परंतु वडील लग्नकार्य सुरळीत पडेल की नाही, या चिंतेत दिसले. लग्नसोहळा म्हटले की, छोट्याछोट्या गोष्टीला पैशांची गरज असते. सभागृह, मंडप डेकोरेशन, कॅटरर्स यांना चेक देऊन थांबविले आहे. परंतु दूध, दही, किराणा, भाजीपाला, ट्रान्सपोर्ट, बँण्डपथक, या गोष्टी तर पैशाशिवाय शक्यच नाही. ५०० आणि १००० च्या नोटा चालत नाही. जो-तो १०० च्या नोटेची मागणी करतो आहे. ट्रान्सपोर्टवाले तर चांगलीच अडवणूक करीत आहेत. एवढा मोठा चिल्लर पैसा आणावा कुठून, असा प्रश्न काळे व्यक्त करीत आहेत. आज बँकेत पैसे मिळायला लागले. परंतु आता वेळ राहिलेला नाही.
अनेकांकडे केली पैशांची मागणी
घरातील पैसा काही उपयोगाचा नाही. बाजारात १०० च्या नोटा उपलब्ध नाही. बँका बंद, एटीएम बंद, पैसे कुठूनही उपलब्ध होत नसल्यामुळे, नातेवाईक, मित्रांना घरात आहे, तेवढे १०० ची नोट, चिल्लर आणण्यास सांगितले आहे. दोन पैसे कमी घेऊन बाजारातही कुणी पैसे उपलब्ध करून द्यायला तयार नाही. लग्नाच्या तोंडावर हे विघ्न, खूप मनस्ताप देत आहे.
भाऊराव काळे
रंगारी कुटुंबीयांपुढेही पेच
नागपूर : ५०० आणि १००० रुपयाचे चलन बंद करण्यात आल्याने सध्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सर्वाधिक अडचण लग्न समारंभ असलेल्या कुटुंबीयांची होत आहे. आठ दिवसावर लग्न आले आहे आणि खर्च करण्यासाठी हातात केवळ दहा हजार रुपये शिल्लक आहे, अशा अडचणीत रंगारी कुटुंबीय सापडले आहे.
कितीही साधेपणाने लग्न लावतो म्हटले तरी सोने वगळता किमान अडीच ते तीन लाख रुपयाचा खर्च येतो. उत्तर नागपुरातील मायानगर येथे राहणाऱ्या रंगारी कुटुंबातील ममता हिचे लग्न येत्या १८ तारखेला वर्धा रोडवरील डॉ. आंबेडकर सभागृहात होणार आहे. घरी आई, आजी आणि दोन भाऊ आहे. बहिणीचे लग्न असल्याने लग्नात कुठलीही कमतरता राहू नये, याची भावांकडून काळजी घेतली जात आहे. आठवडाभरापूर्वीच बँकेतून ५० हजार रुपये काढले. हॉलचा खर्च देऊन झाला. कपडे, कॅटरिंग, व इतर खर्च शिल्लक आहे. अचानक ५०० व १००० रुपयाची नोट बंद झाली. पैसे आहेत पण आता ते घ्यायला कुणी तयार नाही. बँकेतूनही आठवडाभरात २० हजाराच्या वर काढता येणार नाही. लग्नाचे जेवण, हळदीचा कार्यक्रम, मंडप, गाडी आदींसह इतर लहानसहान खर्च भागवणे शक्य नाही. त्यामुळे रंगारी कुटुंबापुढे मोठा बिकट प्रसंग ओढवला आहे. बँकेत पैसे असूनही मार्ग काढण्यासाठी नातेवाईक आणि मित्र मंडळीकडून उसनवारीवर पैसे घेण्याची वेळ आली आहे.