कारवाईच्या धाकाने जीव गमावला
By Admin | Updated: December 23, 2016 01:41 IST2016-12-23T01:41:52+5:302016-12-23T01:41:52+5:30
सेक्स रॅकेटच्या संबंधाने पोलिसांकडून कारवाई होणार असल्याचे लक्षात येताच घाबरलेल्या तरुणाने एका इमारतीवरून

कारवाईच्या धाकाने जीव गमावला
सेक्स रॅकेटचा संबंध : इमारतीवरून घेतली उडी
नागपूर : सेक्स रॅकेटच्या संबंधाने पोलिसांकडून कारवाई होणार असल्याचे लक्षात येताच घाबरलेल्या तरुणाने एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीच्या टेरेसवर उडी घेतली. त्याचा अंदाज चुकल्याने तो खाली पडला आणि गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अजनी पोलीस ठाण्याच्या परिसरात गुरुवारी दुपारी ३ वाजता ही खळबळजनक घटना घडली. यामुळे पोलिसांचेही धाबे दणाणले आहे.
अमर प्रेमदास देशभ्रतार (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. अजनीतील भगवाननगरात राहणारा देशभ्रतार देहविक्रयाच्या धंद्यात गुंतला होता, असे पोलीस सांगतात. त्याने नरेंद्रनगरातील बालपांडे लेआऊटमध्ये नवीन कुंटणखाना सुरू केल्याची माहिती कळताच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने गुरुवारी कारवाईसाठी सापळा लावला. बनावट ग्राहक पाठवून अमर देशभ्रतारचा साथीदार स्वप्निल सिद्धार्थ सलामे (वय २९, रा. रामबाग कॉलनी) याच्यासोबत संपर्क करून देहविक्रयासाठी दोन तरुणींचा चार हजारांत सौदा करण्यात आला.
बनावट ग्राहक बालपांडे लेआऊटमध्ये निर्माण-१ नामक बिल्डिंगमध्ये दुपारी ३ च्या सुमारास पोहचले. तेथे त्यांना तरुणी उपलब्ध झाल्यानंतर पोलिसांचा ताफाही कारवाईसाठी पोहचला. त्यांना पाहून घाबरलेल्या देशभ्रतारने तिसऱ्या माळ्यावरील सदनिकेच्या मागच्या बाल्कनीतून दुसऱ्या इमारतीच्या टेरेसवर उडी घेण्यासाठी स्वत:ला खाली झोकून दिले. मात्र, त्याचा अंदाज चुकला अन् तो टेरेसऐवजी दोन इमारतीच्या मध्ये असलेल्या कम्पाऊंड वॉलवर आदळला.
डोक्याला गंभीर जखमा झाल्यामुळे तो तसाच पडून राहिला. पोलिसांदेखतच हा प्रकार घडला. त्यामुळे पोलिसांनी त्याला तातडीने मेडिकलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी देशभ्रतारला मृत घोषित केले. (प्रतिनिधी)
प्रकरण शेकण्याची शक्यता
या घटनेमुळे कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांचे धाबे दणाणले. त्यांनी लगेच वरिष्ठांना फोनवरून ही माहिती दिली. काही पत्रकारांनाही फोन करण्यात आले. त्यानंतर घटनास्थळ तसेच अजनी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांसह पत्रकारही मोठ्या संख्येत पोहचले. त्यांना माहिती देताना ‘पोलिसांना पाहून देशभ्रतारने पळून जाण्यासाठी इमारतीखाली उडी मारली’ त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. देशभ्रतार सेक्स स्कॅन्डल चालवीत होता, यापूर्वीही त्याच्यावर सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिटा (अनैतिक देहविक्री प्रतिबंधक कायदा)नुसार कारवाई झाल्याचे पोलीस सांगत आहेत. दरम्यान, हे प्रकरण चिघळू शकते अन् संबंधित पोलिसांच्या अंगावरही शेकू शकते, अशी जोरदार चर्चा खुद्द पोलीस वर्तुळातच ऐकायला मिळत आहे.