‘एसएनडीएल’ला दणका
By Admin | Updated: September 21, 2015 02:56 IST2015-09-21T02:56:52+5:302015-09-21T02:56:52+5:30
स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेडच्या (एसएनडीएल) अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हेकेखोर धोरणामुळेच १६ मुक्या जनावरांचे जीव गेल्याचे ...

‘एसएनडीएल’ला दणका
नागपूर : स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेडच्या (एसएनडीएल) अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हेकेखोर धोरणामुळेच १६ मुक्या जनावरांचे जीव गेल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यामुळे जरीपटका पोलिसांनी एसएनडीएलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. मात्र, कोणते अधिकारी आणि कोणते कर्मचारी या घटनेला जबाबदार आहेत, ते स्पष्ट झाले नसल्याने वृत्त लिहिस्तोवर कुणालाही अटक झालेली नव्हती.
जुना जरीपटक्यातील सी.एम.पी.डी.आय. मार्गावर राहणारे सागर सुखराम यादव (वय ५८) यांचा गाई म्हशी पाळण्याचा व्यवसाय आहे. दुधदुभते करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घराजवळच गोठा (गाई-म्हशी बांधण्याची जागा) असून, गोठ्यावरून इलेक्ट्रीक लाईन गेली आहे. ती नेहमीच स्पार्क होत असल्याने जनावरांच्या अंगावर ठिणग्या पडत होत्या. यादव यांनी धोकादायक प्रकाराची तक्रार एसएनडीएलचे लघुवेतन कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे केली होती. दोन आठवड्यात वेळोवेळी तक्रार करूनही अधिकारीच व कर्मचाऱ्यांनीही त्याची दखल घेतली नाही. अशातच १७ सप्टेंबरच्या पहाटे ३ वाजता विजेची लाईन तुटून मुक्या जनावरांवर पडली. त्यामुळे सहा म्हशी, चार म्हशींची पिल्लं, चार गाई, दोन वासरं अशी एकूण १६ जनावर ठार झाली. या घटनेमुळे एसएनडीएल प्रशासनाच्या विरोधात पुन्हा एकदा जनमानसात तीव्र रोष झाला. परिणामी जरीपटका पोलिसांनी यादव यांची तक्रार नोंदवून घेत प्रकरण चौकशीस ठेवले. (प्रतिनिधी)
सेटलमेंटचे प्रयत्न फसले
या दुर्घटनेमुळे यादव यांचे ८ लाख, ४० हजारांचे नुकसान झाले. त्यामुळे एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांनी यादव यांच्याशी सेटलमेंट करून हे प्रकरण थांबविण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, ते प्रयत्न फसले. पोलिसांच्या चौकशीत एसएनडीएल प्रशासनाचा अक्षम्य दुर्लक्षितपणा उघड झाला. यादव यांनी दोन आठवड्यांपूर्वी तक्रार करून धोक्याची सूचना देऊनही त्याची दखल घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे मुक्या जनावरांचे बळी गेल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाल्याचे लक्षात घेत जरीपटका पोलिसांनी एसएनडीएलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. दरम्यान, कोणते अधिकारी आणि कोणते कर्मचारी या घटनेला जबाबदार आहेत, त्याची पीएसआय किन्नाके चौकशी करीत आहेत.