पावित्र्याच्या अनुभूतीसह नृत्याची ध मा ल
By Admin | Updated: December 3, 2015 03:30 IST2015-12-03T03:30:10+5:302015-12-03T03:30:10+5:30
राज्यात सर्वत्र प्राथमिक दांडिया स्पर्धा घेण्यात आली. यातून निवडण्यात आलेल्या चमूंना उपांत्य फेरीत संधी देण्यात आली....

पावित्र्याच्या अनुभूतीसह नृत्याची ध मा ल
राज्यात सर्वत्र प्राथमिक दांडिया स्पर्धा घेण्यात आली. यातून निवडण्यात आलेल्या चमूंना उपांत्य फेरीत संधी देण्यात आली. उत्कृष्ट ठरलेल्या गोवा, अहमदनगर, गडचिरोली आणि नागपूरच्या चमूला अंतिम फेरीत स्थान मिळाले. चारही संघाने आपल्या दमदार सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट चमू म्हणून नागपूरच्या ग्रुपने बाजी मारली. गडचिरोली चमूचा दुसरा क्रमांक तर गोवाच्या चमूने तृतीय क्रमांक पटकाविला.
स्पर्धेला प्रारंभ करण्यापूर्वी सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम आणि स्टार प्रवाहच्या ‘दुर्वा’ मालिकेची नायिका ऋता दुरगुले यांच्या हस्ते ईश्वरचिठ्ठी काढून नृत्य सादरीकरण करणाऱ्या चमूचा क्रम निश्चित करण्यात आला. गोव्याच्या संघाने प्रथम सादरीकरण केले. ‘ऐ ढोलो मारो ढोल बुजो रे...’ गीतावर या संघाने केलेले सादरीकरण उपस्थितांची दाद घेणारे होते. या संघान द्रौपदी वस्त्रहरण, शेषनाग आदी दृष्य साकारून नृत्य सादर केले. रंगीबेरंगी पोशाख आणि गीतांवर ताल धरीत कलावंतांनी सादर केलेल नृत्य भाव खाणारे होते. नृत्याच्या शेवटी ‘रिस्पेक्ट वूमन’ हा संदेशही दिला. अहमदनगर चमूने, महादेव जप करण्यात तल्लीन झाल्यामुळे पार्वतीने रक्तबीज राक्षसाचा संहार करण्याचा ठरविले. तिने त्याचा संहार केला पण त्याच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून राक्षस निर्माण झाले. त्यामुळे क्रोधीत होऊन पार्वतीने महाकालीचे रूप धारण केले. पार्वतीचा क्रोध शांत करण्यासाठी महादेव रणात येतात आणि पार्वतीचा क्रोध शांत करतात. असा प्रसंग सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. गडचिरोली संघाने ‘बेटी बचाव’ हा संदेश देत नृत्याविष्कारातून उपस्थितांना विचारप्रवृत्त केले. नागपूरच्या संघाने नारी महत्त्वाची आहे. आपल्या संस्कृतीत नारीची पूजा करण्यात येते आणि ज्या ठिकाणी नारीला सन्मान दिला जातो तिथेच सुखसमृद्धी नांदते अशा आशयाचे नृत्य सादर करून उपस्थितांची दाद घेतली. या स्पर्धेत नागपूरच्या चमूला ५१ हजार रुपये व ट्रॉफी प्रदान करून विजयी घोषित करण्यात आले. ३१ हजाररुपयांच्या पारितोषिकासह गडचिरोलीच्या चमूने द्वितीय स्थान तर २१ हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक गोवाच्या चमूने पटकाविले. या अंतिम स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध लोकगीत गायक अरविंद वेगडा, अभिनेत्री ऋता दुरगुले, कोरिओग्राफर राजेश सेदानी आणि कत्थक नृत्यांगना किरण भेले यांनी केले.