आॅर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार
By Admin | Updated: December 9, 2015 03:20 IST2015-12-09T03:20:53+5:302015-12-09T03:20:53+5:30
ते जेव्हा सुरू व्हायचे तेव्हा होतील. नागपुरात आणि आजूबाजूच्या भागात मात्र अनेक वर्षांपासून चोरी छुप्या मार्गाने अनेक डान्सबार सुरू आहेत.

आॅर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार
‘मदिरा’तील छमछमचा आवाज गृह मंत्रालयात
नागपूर : ते जेव्हा सुरू व्हायचे तेव्हा होतील. नागपुरात आणि आजूबाजूच्या भागात मात्र अनेक वर्षांपासून चोरी छुप्या मार्गाने अनेक डान्सबार सुरू आहेत. ग्राहकांकडून नोटांची उधळण होत असल्यामुळे मध्यरात्री सीसीटीव्ही बंद करून बारमालक बारबालांना बिनधास्त नाचवतात. लोकमतने अनेकदा हे ठळकपणे प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसापर्यंत हे बंद व्हायचे. पुन्हा छमछम सुरू व्हायची.
रविवारी अशाच प्रकारे सेंट्रल एव्हेन्यूवरील मदिरा बार अॅन्ड रेस्टॉरंटमध्ये आॅर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार सुरू असल्याची ‘सचित्र’ माहिती मिळाल्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी बारमालक नीरज गुप्ता, व्यवस्थापक श्रीकांत गायकवाड, उमेश तिवारी तसेच हरिदास मेश्राम या चौघांना अटक केली. तीन बारबालांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ठाण्यात नेले.
या तिघीही अनेक दिवसांपासून मुंबईत बस्तान मांडून असून त्यातील एक मुंबईची, दुसरी (लुधियाना) पंजाब तर तिसरी मूळची नेपाळची आहे. मात्र, ती मुंबईतच स्थायिक झाली असून, विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट रकमेचा करार करून त्या वेगवेगळ्या शहरात ‘परफॉर्मन्स’साठी पोहचतात. बारमालकाने दलालाच्या माध्यमातून मुंबई आणि नेपाळच्या बारबालेला प्रत्येकी ७५ हजार तर पंजाबमधील तरुणीला १ लाख रुपये महिना करारावर येथे आणले होते.
गायन आणि नृत्य करण्यासोबत अनेक बारबाला नंतर देहविक्रयही करतात. त्यातही बारमालकाचे कमिशन असते. पुढच्या दोन आठवड्यात ठिकठिकाणची आंबटशौकिन मंडळी नागपुरात येणार हे लक्षात घेत मोठ्या प्रमाणात बारबालांना येथे बोलावून घेण्यात आले होते.
मात्र, एका सजग नागरिकाने डान्सबारची क्लिपिंग तयार केली आणि लेखी तक्रारीसह ती मुख्यमंत्री, पोलीस आयुक्तांना पाठविली. ही क्लिपिंग व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून व्हायरल केली. लोकमतने डान्सबारचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले होते. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. गृह मंत्रालयातही ‘छमछम’चा आवाज पोहचला. त्यानंतर राज्यमंत्री राम शिंदे यांनी २४ तासात या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)