प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहने'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील मल्हार या गीतावर केलेल्या मल्हारी नृत्यामुळे आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेची अंतिम फेरी रंगतदार ठरली.
नृत्याची रंगत, रणवीरची धमाल अन साधनाचा 'सरगम'
लोकमत सखी मंच: आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेची अंतिम फेरी
नागपूर : प्रसिद्ध सिनेअभिनेता रणवीर सिंह याने 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील मल्हार या गीतावर केलेले मल्हारी नृत्य..सुप्रसिद्ध पार्श्वगायिका साधना सरगम यांच्या सुरेल गीतांची रंगलेली मैफील.. गुजरातचे लोकगीत गायक अरविंद वेगडा यांनी गीतातून भरलेला जोश, दांडियाच्या तालावर थिरकणारे प्रेक्षक.. प्रचंड उत्साहाचे वातावरण..त्यात स्टार प्रवाह वाहिनीवरील 'दुर्वा' मालिकेची नायिका ऋता दुरगुले यांनी प्रेक्षकांशी साधलेला संवाद..उत्कृष्ट सजविलेला रंगमंच आणि आकर्षक रंगीबेरंगी प्रकाशझोतांनी उजळून जाणारा आसमंत..अत्याधुनिक ध्वनियंत्रणेवर मदहोष करणारे संगीत आणि हवीहवीशी वाटणारी मंद वार्यासह अंगावर झेपावणारी थंडी. सारेच वातावरण उत्सुकता आणि उत्कंठेत बुडालेले. अशा वातावरणात लोकमत सखी मंचच्यावतीने आयोजित आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेची अंतिम फेरी रंगतदार ठरली. लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा, लोकमत सखी मंचच्या अध्यक्षा दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह, सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम, स्टार प्रवाहच्या 'दुर्वा' मालिकेची नायिका ऋता दुरगुले, सुप्रसिद्ध लोकगीत गायक व पार्श्वगायक अरविंद वेगडा, लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, महापौर प्रवीण दटके आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ साधना सरगम यांच्या सुरेल गीतांनी झाली. तिने लोकप्रिय असलेले गीत 'निले निले अंबर पे..' सादर केले आणि उपस्थितांनी या सादरीकरणाला दाद देत कार्यक्रमात रंग भरला. याप्रसंगी तिने 'पहला नशा.., चक दे चक दे.., हर किसी को नही मिलता यहा प्यार जिंदगी मे..' आदी अनेक गीतांनी समा बांधला. पण रसिकांनी तिला मराठी गीत सादर करण्याची विनंती केली आणि प्रेक्षकांच्या विनंतीला मान देत साधना सरगमनेही मराठी गीतांचे सादरीकरण करून रसिकाना जिंकले. याप्रसंगी तिने 'जांभुळ पिकल्या झाडाखाली..' हे गीत सादर करून स्टेडियम डोक्यावर घेतले. यानंतर 'रेशमाच्या रेघांनी..' ही लावणी सादर केली. सुप्रसिद्ध पार्श्वगायक आणि लोकगीत गायक अरविंद वेगळा यांनी खास गुजराती गीत सादर करून रसिकांची दाद घेतली. तर नायिका ऋता दुरगुले हिने रसिकांच्या मनाचा ठाव घेत संवाद साधला. हा सगळाच आनंद अनुभविताना प्रेक्षक धमाल दांडियाच्या अंतिम फेरीसाठीही उत्सुक झाले होते. अंतिम फेरीला अतिथींच्या हस्ते ईश्वरचिठ्ठी काढून प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांनी एकच जल्लोष करीत दांडियाच्या चमूंना प्रोत्साहित केले. सर्वप्रथम गोव्याच्या चमूने दांडियाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यानंतर अहमदनगर, गडचिरोली आणि अखेर नागपूरच्या चमूने कलात्मकतेने दांडिया नृत्य सादर करून ही स्पर्धा अधिक उंचावर नेली. स्पर्धा सुरू असताना अभिनेता रणवीर सिंहने ढोल-ताशांच्या आणि तुतारीच्या निनादात रंगमंचावर प्रवेश केला. तो आला..नाचला..गायिला आणि त्याने प्रेक्षकांना जिंकले. नमस्कार..कसे काय नागपूर? असा मराठी संवाद साधला. त्याला नागपूरकरांनीही 'बरे आहे नागपूर' असा प्रतिसाद देत त्याचे स्वागत केले. यावेळी त्याने 'हर हर महादेव'चा जयघोष आणि बाजीराव मस्तानी चित्रपटातील संवाद सादर करून त्याने मल्हारी नृत्य सादर करून दाद घेतली. दरम्यान लोकमत सखी मंचच्या ओळखपत्राचे लोकार्पण अतिथींच्या हस्ते करण्यात आले. 51000 रुपयाचे प्रथम पारितोषिक नागपूरच्या चमूने पटकाविले. ३१ हजार रुपयाचे द्वितीय पारितोषिक गडचिरोलीच्या चमूने मिळविले तर २१ हजार रुपयाचे तृतीय पारितोषिक गोव्याच्या चमूला प्रदान करण्यात आले. या महाअंतिम फेरीचे परीक्षण अरविंद वेगडा, ऋता दुरगुले व प्रसिद्ध कोरिओग्राफर राजेश सेदानी आणि कत्थक विशारद किरण भेले यांनी केले. लोकमत सखी मंचच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी नागपुरातील चिटणीस पार्क, महाल येथे आयोजित आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत सुप्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहने प्रेक्षकांच्या आग्रहास्तव 'बाजीराव मस्तानी' सिनेमातील 'मल्हारी..' या शौर्य गीतावर तुफान नृत्य केले. त्याच्या या नृत्याला उपस्थित रसिकांनी मनमोकळी दाद दिली. याप्रसंगी रणवीर सिंहला भेटण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी चिटणीस पार्क भरगच्च फुलले होते.
Web Title: Dance of the dance, Ranveer's work and the science of 'Sargam'