नागपूर: जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकरी गट तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनामार्फत शेळी आणि एक बोकड अनुदानावर देण्याची योजना आहे़. आता कमी कालावधीतील वाढ व अधिक प्रमाणात मांस देणारी प्रजाती सिरिया या देशानंतर नागपुरात तयार होत आहे़. यासाठी ग्रामीण भागातील विविध पशू प्रजनन केंद्रात यावर प्रक्रिया सुरू आहे़. पुढील पाच महिन्यांत ही प्रजाती जन्माला येणार असल्याने यापुढे दमास्कस बोकडच लाभार्थ्यांना अनुदानावर मिळणार आहे.
यासाठी पशुसंवर्धन विभागाने या बोकडाच्या प्रजातीचे वीर्य हे थेट सिरिया देशातील काही संस्था व राज्यातील सातारा पशू पैदास केंद्रातून मागविले आहे़. ते प्रजनन केंद्रात वजा १९६ डिग्री सेल्सिअसमध्ये स्टोअर करण्यात आले आहे़. दमास्कस बोकड हा अधिक मांस देणारा बोकड म्हणून प्रसिद्ध आहे़. साधारणत: या एका बोकडापासून ५५ ते ६० किलो मांस मिळते़. त्यामुळे लाभाच्या योजना राबविताना शेतकऱ्यांचा अधिक फायदा व्हावा, या हेतूने अशाप्रकारच्या प्रजातीची निर्मिती नागपूर जिल्ह्यात व्हावी, असा पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांचा मानस होता. त्यामुळे शेळी-मेंढी विकास महामंडळाच्या मार्फत ही प्रजाती तयार करण्यासाठी पाठपुरावा झाला़.
जवळपास २५० डोसेज सिरिया व्हाया सातारानंतर नागपुरात पोहोचले़. दमास्कस नावाची प्रजाती उत्पादन करणारा नागपूर जिल्हा राज्यात दुसरा ठरणार आहे़. दमकसच्या प्रजातीचे वीर्य येथील वातावरणानुसार उस्मानाबादी व बेरारी प्रजातीच्या बकऱ्यांमध्ये ‘ब्रिडिंग’ करण्यात येणार आहे़. यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टर व पशुसंवर्धन व मस्त्य विद्यापीठाच्या संशोधकांची टीम काम करीत आहे़
- ‘डिजिटल गन’ने गर्भधारणा
ही प्रजाती तयार करण्यासाठी प्रथमच डिजिटल गन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे़. बकरीला गर्भधारणा होण्यासाठी दमास्कस बोकडाचे वीर्य तिच्या गर्भात निर्धारित करण्यासाठी डिजिटल गनचा वापर करण्यात येत आहे. प्रक्रियेतून गर्भाची स्थिती व सर्व प्रक्रिया इन कॅमेरा पाहता येईल़ त्यामुळे कृत्रिम गर्भधारणा ही चुकीची झाली असे म्हणता येणार नाही, असे जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयातील डॉक्टरांच्या चमूने सांगितले.