दररोज १८ जणांच्या नशिबी बेवारस मरण!
By Admin | Updated: November 6, 2014 02:47 IST2014-11-06T02:47:05+5:302014-11-06T02:47:05+5:30
माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही केवळ ओळख पटत नसल्याच्या एकमात्र कारणामुळे राज्यात दररोज ...

दररोज १८ जणांच्या नशिबी बेवारस मरण!
नागपूर : माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही केवळ ओळख पटत नसल्याच्या एकमात्र कारणामुळे राज्यात दररोज सरासरी १८ जणांच्या नशिबी बेवारस मरण येत आहे.
शासकीय यंत्रणांच्या उदासिनतेमुळे मृतदेह बेवारस राहत असून, बेवारस मृतदेह म्हणूनच त्यांना मूठमाती दिली जात आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर महानगरपालिका आणि स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण राज्यात २००९ मध्ये ६,८९५, २०१० मध्ये ७,६५१, २०११ मध्ये ६,३१३ आणि २०१२ मध्ये ५,९०६ एवढे बेवारस मृतदेह आढळून आले होते. गेल्या चार वर्षांत २६ हजार ७६५ जणांचा बेवारस मृत्यू झाला असून सरासरी दररोज १८ जणांच्या नशिबी बेवारस मरण येत आहे.
नागपूरची २०१० ची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यानुसार नागपूर ग्रामीण भागात ६९, नागपूर रेल्वेच्या हद्दीत ५८० आणि नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ४५२ मृतदेह बेवारस स्थितीत आढळून आले होते.
नागपूर महानगरपालिकेकडून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या त्रोटक माहितीनुसार २००८-०९ या काळात ३०१, २००९-१० या काळात ४७८ आणि २०१०-११ या काळात ५८१ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अखेरच्या दोन वर्षांची आकडेवाडी अंकेक्षणामुळे तूर्त उपलब्ध नसल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.
मृतदेहांचा वाली पोलिसच
धार्मिकस्थळांच्या आश्रयाने, रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि शासकीय इस्पितळांचे आवार, पुलांच्या खाली, शहर बसथांब्याच्या शेडमध्ये, रस्त्याच्या कडेला शेकडो लोक बेवारस जीवन जगत आहेत. काहींचा अपघाती, काहींचा दुर्धर आजाराने तर काहींचा नैसर्गिक आपत्तीने मृत्यू होतो. काही स्वत:हून जीवनाला कंटाळून आत्महत्या करतात. या मृतदेहांचा एकमात्र वाली पोलीस कर्मचारी असतो. ओळख पटत नाही म्हणून मृतदेह बेवारस असतात. अशा मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु ते अपुरे ठरतात. मृतदेहाबाबत संपूर्ण वर्णन असलेला पंचनामा त्यांना करावा लागतो. भविष्यात मृतदेहाची ओळख पटावी म्हणून छायाचित्रेही घेतली जातात. ओळख पटावी म्हणून मृतदेहाच्या माहितीसह ‘टेलिग्राम मॅसेज’ प्रसारित केल्या जातो. वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांकडे हा संदेश पाठविला जातो. मृतदेह शवागारात ठेवल्यानंतर संदेश जारी केल्यापासून ७२ तासांत ओळख पटली नाही तर अशा मृतदेहांचा कायद्यानुसार विल्हेवाटीचा अधिकार पोलिसांना प्राप्त होऊन ते उत्तरीय तपासणीनंतर मृतदेहाला मूठमाती देतात.
कुजलेल्या मृतदेहांची विल्हेवाट लावली जाते. पुढेमागे मृत व्यक्तीचे नातेवाईक आल्यास आणि त्यांनी मृतदेहाच्या ताब्याचा दावा केल्यास ‘कोरोनर्स अॅक्ट १९८८’ नुसार पुरलेला मृतदेह बाहेर काढून संबंधित नातेवाईकांच्या स्वाधीन करण्याचा अधिकार जिल्हा दंडाधिकाऱ्याला आहे.
मृतदेहाचा अनादर होतो गुन्हा
ह्युमन ट्रान्सप्लान्ट अॅक्ट १९९४ नुसार इस्पितळ प्राधिकारी ४८ तासात ओळख न पटलेल्या मृतदेहाचे अवयव काढण्याची परवानगी देऊ शकतात. संबंधित मृताची ओळख पटण्याची शक्यता असल्यास आणि नातेवाईक यावर आक्षेप घेऊ शकतात, असे वाटल्यास इस्पितळ प्राधिकारी अवयव काढून घेण्याची परवानगी नाकारू शकतो. मृतदेहाचा कोणत्याही प्रकारे अनादर किंवा अवहेलना झाल्यास संबंधितांवर भादंविच्या २७९ कलमान्वये कारवाई केली जाऊ शकते. यात एक वर्ष कारावासाच्या शिक्षेचे प्रावधान आहे.
आधार कार्डचा फायदा काय ?
कोणत्याही ठिकाणी बेवारस स्थितीत मृत झालेली व्यक्ती ही निश्चितच कुठली ना कुठली रहिवासी आणि कुणाची तरी नातेवाईक असते. ‘आधार कार्ड’ काढताना संबंधित व्यक्तीचे ‘फिंगर प्रिंटस्’ आणि चेहरेपट्टी घेतली जाते. पोलिसांकडूनही बऱ्याच प्रसंगात फिंगर प्रिंटस् घेतले जातात.
या फिंगर प्रिंटद्वारे बेवारस मृतदेहाची ओळख पटविली जाऊ शकते. प्रसार माध्यमांचीही यासाठी मदत घेतली जाऊ शकते.