हाणामारीत दाेघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:09 IST2021-03-14T04:09:38+5:302021-03-14T04:09:38+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : जुन्या वैमनस्यातून झालेल्या हाणामारीत एक गंभीर तर दुसरा किरकाेळ जखमी झाला. यातील आराेपीस अटक ...

हाणामारीत दाेघे जखमी
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : जुन्या वैमनस्यातून झालेल्या हाणामारीत एक गंभीर तर दुसरा किरकाेळ जखमी झाला. यातील आराेपीस अटक करण्यात आली आहे. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवराबाजार येथे शुक्रवारी (दि. १२) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
विश्वास मोहन मेश्राम (३४) असे गंभीर तर अमोल अशोक बागडे (२५) असे किरकाेळ जखमीचे तसेच अश्विन अशोक बागडे (२१) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. हे तिघेही हिवराबाजार, ता. रामटेक येथील रहिवासी आहेत. अमाेल व अश्विन हे दाेघेही भाऊ असून, त्यांनी त्यांच्या घराचे बांधकाम सुरू केले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अंजली मेश्राम यांच्या घरासमाेर गिट्टीचा ढीग टाकला. अंजली मेश्राम त्या घरी राहत नसल्याने या दाेघांनीही मेश्राम यांचे किरायेदार राजू मेश्राम यांची परवानगी घेतली हाेती.
जवळच विश्वास मेश्रामचे घर आहे. याच गिट्टीच्या ढिगावरून विश्वासचे अमाेल व अश्विनसाेबत भांडण झाले. विश्वासने अमाेलच्या गालावर काठीने वार केल्याने ताे जखमी झाला. भावाला मारहाण करीत असल्याचे पाहून अश्विनने घरातून सब्बल आणून विश्वासच्या डाेक्यावर वार केले. त्यात ताे गंभीर जखमी झाला. देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमाेपचार केल्यानंतर त्याला नागपूर येथील मेयाे रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या प्रकरणी देवलापार पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून आराेपी अश्विनला अटक केली. या घटनेचा तपास ठाणेदार प्रवीण बाेरकुटे करीत आहेत.
...
काैटुंबिक वाद
विश्वासने सहा वर्षांपूर्वी अश्विनच्या बहिणीसोबत प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून या दोन कुटुंबांत वाद सुरू आहे. मध्यंतरी अश्विनच्या वडिलांचे निधन झाले तेव्हाही अमाेल व अश्विनने विश्वास व स्वत:च्या बहिणीला अंत्यसंस्कारासाठी येऊ दिले नव्हते. या सहा वर्षांपूर्वीच्या वादाचे शनिवारी रात्री हाणामारीत रूपांतर झाले.