दाभोलकर, पानसरेंच्या खुनाचा तपास न्यायालयाच्या नियंत्रणात व्हावा
By Admin | Updated: July 14, 2015 03:13 IST2015-07-14T03:13:19+5:302015-07-14T03:13:19+5:30
डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाला २० जुलैला २३ महिने पूर्ण होत आहे. खुनाचा तपास सीबीआयकडे सोपवूनही काहीही ठोस

दाभोलकर, पानसरेंच्या खुनाचा तपास न्यायालयाच्या नियंत्रणात व्हावा
नागपूर : डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाला २० जुलैला २३ महिने पूर्ण होत आहे. खुनाचा तपास सीबीआयकडे सोपवूनही काहीही ठोस हाती आलेले नाही. अॅड. गोविंद पानसरेंच्या खुनालाही पाच महिने पूर्ण होत आहे. विशेष तपास पथकालाही काही गवसले नाही.
सरकारच्या तपास यंत्रणेवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे दोन्ही खुनाचा तपास न्यायालयाच्या नियंत्रणात व्हावा, यासाठी समितीतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खुनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी समितीतर्फे ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ प्रबोधन अभियान राबविण्यात येणार आहे. २० जुलैला मुंबईत राज्यव्यापी धरणे देऊन अभियानाची सुरुवात होणार आहे. हे अभियान महिनाभर चालणार आहे. यात राष्ट्रपतींच्या नावे लाखो पोस्टकार्ड लिहिणे, लोकप्रतिनिधींना शिष्टमंडळासह भेटून विचारणा करणे, तालुक्यांमध्ये विविध प्रबोधनाचे कार्यक्रम, जिल्हानिहाय धरणे, निदर्शने, मोर्चे काढण्यात येणार असल्याचे समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रपरिषदेत सांगितले. तसेच समितीच्या कार्याला २५ वर्षे पूर्ण झाली यानिमित्त ७ आॅगस्ट रोजी ‘विवेकवाद्यांची राष्ट्रीय परिषद’ घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यात अंनिसच्या २५ वर्षाच्या कार्याचा ऊहापोह आणि भविष्याच्या वाटचालीची क्षेत्रे यावर चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेला गजेंद्र सुरकार, संजय शेंडे, विनोद उल्लीपवार, मधुकर धंदरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)