शेअर मार्केटमधील नफ्याचे आमिष; ज्येष्ठ नागरिकाची अडीच कोटींनी फसवणूक
By योगेश पांडे | Updated: January 17, 2024 20:12 IST2024-01-17T20:11:59+5:302024-01-17T20:12:04+5:30
व्हॉट्सअप ग्रुममधील आरोपीच्या साथीदारांनी नफ्याचे आमिष दाखवत दुलारामानी यांना डी-मॅट खाते बनविण्यास सांगितले.

शेअर मार्केटमधील नफ्याचे आमिष; ज्येष्ठ नागरिकाची अडीच कोटींनी फसवणूक
नागपूर : शेअर मार्केटमधील नफ्याचे आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी एका ज्येष्ठ नागरिकाला आपल्या जाळ्यात ओढले व तब्बल अडीच कोटींनी फसवणूक केली. सायबर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोती किशनचंद दुलारामानी (७८, तत्व अपार्टमेंट्स, कॅनल रोड, रामदासपेठ) असे फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. ते घरी मोबाईल हाताळत असताना त्यांना अनोळखी व्यक्तीने फेसबुकच्या माध्यमातून शेअर बाजाराबाबतची जाहिरात पाठविली. शेअर बाजारात गुंतवणूक केली तर १५ ते २० टक्के नफा दिला जाईल असे आमिष त्यात दाखवले होते. दुलारामानी यांनी याबाबत उत्सुकता दाखवली असता आरोपीने त्यांना एक लिंक पाठवली. त्यावरून आरोपींनी त्यांना स्टॉक फ्रंटलाईन या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करवून घेतले.
व्हॉट्सअप ग्रुममधील आरोपीच्या साथीदारांनी नफ्याचे आमिष दाखवत दुलारामानी यांना डी-मॅट खाते बनविण्यास सांगितले. ११ नोव्हेंबर २०२३ ते ८ जानेवारी या कालावधीत आरोपींनी त्यांना शेअर्सच्या खरेदी-विक्रीसाठी बनावट लिंक्स पाठविल्या. दुलारामानी यांनी २.७५ कोटी रुपये गुंतविले. आरोपींनी त्यांना २६.३१ लाख रुपये शेअर बाजरातील नफ्याच्या नावाखाली परत केले. मात्र त्यानंतर दुलारामानी यांनी उर्वरित रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता ती रक्कम निघालीच नाही. त्यांनी ग्रुपमधील इतर सदस्य व आरोपींशी संपर्क केला असता डी-मॅट खाते रिचार्ज करावे लागेल असे उत्तर त्यांना सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याची बाब दुलारामानी यांच्या लक्षात आली. आरोपींनी त्यांची एकूण २ कोटी ५८ लाख ६९ हजार रुपयांनी फसवणूक केली. त्यांनी आपल्या कुटुंबियांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.