ग्राहकांना सव्वाकोटीने चुना - ज्वेलर्स महिलेला जामीन

By Admin | Updated: August 29, 2014 01:00 IST2014-08-29T01:00:57+5:302014-08-29T01:00:57+5:30

तब्बल २९४ ग्राहकांची १ कोटी २५ लाख रुपयांनी लुबाडणूक करणाऱ्या एका ज्वेलर्स महिलेला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Customers Liked by Savvakoti - Jewelers Bail For Women | ग्राहकांना सव्वाकोटीने चुना - ज्वेलर्स महिलेला जामीन

ग्राहकांना सव्वाकोटीने चुना - ज्वेलर्स महिलेला जामीन

नागपूर : तब्बल २९४ ग्राहकांची १ कोटी २५ लाख रुपयांनी लुबाडणूक करणाऱ्या एका ज्वेलर्स महिलेला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला.
उषा यज्ञेश्वर टेटे (५५) असे या महिलेचे नाव असून, ती सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रघुजीनगर आयुर्वेदिक ले-आऊट येथील रहिवासी आहे. गुन्ह्याच्या प्रथम खबरी अहवालानुसार, या महिलेचे आयुर्वेदिक ले-आऊट येथे दुर्गा अलंकार ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या महिलेविरुद्ध पहिली तक्रार नरसाळा येथील रहिवासी राजपाल ईश्वरराव वैद्य यांनी २ एप्रिल २०१४ रोजी सक्करदरा पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यावरून या महिलेविरुद्ध भादंविच्या ४०६, ४०९, ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी तिला अटक करण्यात आली होती. पुढे या महिलेविरुद्ध तक्रारींचा ओघ वाढत गेला. २९४ ग्राहकांनी तिच्याविरुद्ध तक्रारी नोंदविल्या. त्यांची एकूण फसवणुकीची रक्कम १ कोटी २५ लाख रुपये आहे.
राजपाल वैद्य यांनी २२ एप्रिल २०१३ रोजी उषा टेटे हिला १५ ग्रॅम सोन्याचा गोफ बनविण्यासाठी दिला होता. यासाठी त्यांनी स्वत:जवळील १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ आणि ३,५०० रुपये रोख दिले होते. वारंवार दागिन्याची मागणी करूनही तिने गोफ बनवून दिला नाही आणि ३६ हजार ७४० रुपयांची फसवणूक केली. दरम्यान, अन्य ग्राहकांनी दागिने आणि पैसे परत मागण्यासाठी तिच्या घरावर गर्दी केली होती.
या महिलेने कुणाचे गहाण ठेवलेले दागिने तर कुणाचे बनविण्यास दिलेले दागिने हडप केले होते. अटक झाल्यापासून ही महिला कारागृहातच होती. तिच्याकडून मुंबई आणि बांद्रा येथील मालमत्तेच्या आममुख्त्यारपत्राचे दस्तऐवज, अमरावती येथील शेती खरेदीबाबत कागदपत्रे, बीएमडब्ल्यू कार आदी जप्त करण्यात आले आहे. तिच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. या महिलेने न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. न्यायालयात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. अशोक भांगडे, अ‍ॅड. मिलिंद देवगडे, अ‍ॅड. वैभव जगतात आणि अ‍ॅड. दीपाली दियेवार यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Customers Liked by Savvakoti - Jewelers Bail For Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.