अपहृत युवतीला दिले कुटुंबीयांच्या ताब्यात
By Admin | Updated: January 8, 2017 02:52 IST2017-01-08T02:51:12+5:302017-01-08T02:52:56+5:30
पळून गेलेल्या महिला व मुलीचा शोध नाही!

अपहृत युवतीला दिले कुटुंबीयांच्या ताब्यात
अकोला, दि. ७- नागपूरमधील मोमीनपुरा येथील एका खासगी रुग्णालयात कामावर असलेल्या युवतीला प्रेमाच्या जाळय़ात ओढून तिचे बुरखाधारी महिलेच्या साहाय्याने नागपुरातून अपहरण केल्यानंतर सदर युवतीची शुक्रवारी सुटका करण्यात आली. त्यानंतर शनिवारी जीआरपी पोलिसांनी सदर युवतीस तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात शुक्रवारी शेगाव रेल्वेस्थानकावरून पळून गेलेली बुरखाधारी महिला आणि तिच्यासोबतची जखमी अवस्थेत असलेल्या मुलीचा पोलिसांनी शोधच घेतला नसल्याची माहिती आहे.
नागपूर येथील रहिवासी २१ वर्षीय युवती नागपूरमधीलच मोमीनपुरा येथील रहिवासी डॉ. खान यांच्या हॉस्पिटलमध्ये कामावर आहे. या युवतीला दीपक नामक युवकाने प्रेमाच्या जाळय़ात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर सदर युवतीला गुंगीचे औषध देऊन एका बुरखाधारी महिलेच्या साहाय्याने तिचे अपहरण केले होते. या प्रकरणाची तक्रार नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली; मात्र त्यानंतर सदर युवतीला एक बुरखा घालून शेगाव रेल्वे स्टेशनवरून हैदराबाद येथे नेण्यात येत असतानाच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने तिची शुक्रवारी रात्री सुटका करण्यात आली. त्यानंतर सदर युवतीला जीआरपी पोलीस स्टेशनमध्ये ठेवून शनिवारी पहाटे तिला आई, जावई आणि भावाच्या ताब्यात दिले; मात्र या प्रकरणातील अपहरण करणारी आणि शेगाव रेल्वेस्थानकावरून पळून गेलेली बुरखाधारी महिला आणि तिच्यासोबत असलेली चिमुकली मुलगी यांचा कोणताही शोध शेगाव जीआरपीने घेतला नाही. त्यामुळे सदर गंभीर प्रकरणामध्ये पोलिसांनी कोणतेही गांभीर्य बाळगले नसल्याचे वास्तव आहे.