चालू तिकीट कार्यालय चोरट्यांचा अड्डा
By Admin | Updated: June 6, 2015 02:08 IST2015-06-06T02:08:37+5:302015-06-06T02:08:37+5:30
रेल्वेगाडी येण्यास वेळ असल्यामुळे बहुतांश प्रवासी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात लोहमार्ग पोलीस

चालू तिकीट कार्यालय चोरट्यांचा अड्डा
नागपूर : रेल्वेगाडी येण्यास वेळ असल्यामुळे बहुतांश प्रवासी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात लोहमार्ग पोलीस ठाण्यासमोरील चालू तिकीट कार्यालयाच्या मोठ्या हॉलमध्ये आराम करतात. याचा फायदा घेऊन तेथे चोरट्यांचा उपद्रव वाढला असून प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तेथे पोलिसांची ड्युटी लावण्याची मागणी होत आहे.
शुक्रवारी अजित मिश्रा (५०) रा. पुणे हे आपल्या वैयक्तिक कामानिमित्त जयपूरला जात होते. गाडी येण्यासाठी थोडा उशीर असल्यामुळे ते चालू तिकीट कार्यालयाच्या हॉलमध्ये आराम करीत होते. त्यांनी आपली बॅग बाजूलाच ठेवली होती. तेवढ्यात एक भिकारी त्यांना पैसे मागण्यासाठी त्यांच्याजवळ आला. त्याला पैसे देत असताना दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग घेऊन पळ काढला. त्यांच्या बॅगमध्ये चार हजार रुपये रोख, कपडे होते. बॅग चोरीला गेल्यामुळे आणि त्यात पैसे असल्यामुळे हा प्रवासी चिंतातूर होऊन इकडेतिकडे फिरत होता. चालू तिकीट कार्यालयाच्या परिसरात असामाजिक तत्त्वांचा उपद्रव वाढला आहे. प्रवाशांचे महागडे साहित्य, मोबाईल, पाकिट चोरीला जाण्याच्या घटना येथे नेहमीच घडतात. परंतु त्यापासून लोहमार्ग पोलिसांनी कोणताच धडा घेतलेला दिसत नाही. (प्रतिनिधी)