चलन चालणारच

By Admin | Updated: November 10, 2016 02:59 IST2016-11-10T02:59:38+5:302016-11-10T02:59:38+5:30

पाचशे व हजार रुपयांचे चलन बदलण्यासंदर्भातील निर्णयानुसार जनतेने घाबरून न जाता संयम पाळावा,

The currency runs | चलन चालणारच

चलन चालणारच

संयम पाळा : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली पेट्रोल पंप, मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
नागपूर : पाचशे व हजार रुपयांचे चलन बदलण्यासंदर्भातील निर्णयानुसार जनतेने घाबरून न जाता संयम पाळावा, पेट्रोल पंप, शासकीय दवाखान्यांमध्ये आवश्यक सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. ११ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत पाचशे व हजार रुपयाचे चलन सुरू राहणार असल्यामुळे जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध बँकांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केंद्र शासनाने चलनातून पाचशे व हजार रुपयाच्या नोटा बदलण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयानुसार जनतेला आवश्यक सुविधा पूर्ववत सुरु राहण्यासंदर्भात आढावा घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
चलनातील पाचशे व हजार रुपयांचा नोटा बदलविण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतचा कालावधी दिला आहे. त्यामुळे चलन बदलणे अथवा बँकेच्या खात्यात जमा करण्यासाठी आवश्यक कालावधी असल्यामुळे कुणीही घाबरून अथवा गोंधळून न जाता चलन बदलवून घ्यावेत अथवा बँकेत जमा करावेत. बँकांनी ग्राहकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच ग्राहकांनाही सेवेबद्दल विश्वास निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व बँका गुरुवार १० नोव्हेंबर पासून नियमित सुरू राहणार आहेत. बँकेमध्ये ग्राहकांसाठी आवश्यकतेनुसार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बँक नियमित सुरू राहणार असल्यामुळे एकाच दिवशी गर्दी करण्याची आवश्यकता नसून पाचशे व हजार रुपयाचे चलन बँक खात्यात जमा करता येईल यासाठी रिझर्व्ह बँकेतर्फे सूचित केल्यानुसार आवश्यक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. चलन बदलण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल. चलन १५ दिवसांपर्यंत चार हजार रुपये या मर्यादेत बदलता येईल. तसेच बँकेतून पैसे काढण्याकरिता जास्तीतजास्त दहा हजार रुपये दरदिवशी व एका आठवड्यात २० हजार रुपये काढण्याची मर्यादा आहे. ग्रामीण भागातील जनतेला चलन बदलणे अथवा बँकेत जमा करण्यासंदर्भात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा सूचना यावेळी जिल्हाधिकारी कुर्वे यांनी दिल्यात. तसेच जनतेला त्रास होणार नाही यादृष्टीने सहकार्य करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)

शुक्रवारपासून एटीएम सुविधा
एटीएम मधून पैसे काढण्याची सुविधा शुक्रवार ११ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त दोन हजार रुपये १८ नोव्हेंबर पर्यंत काढता येतील. त्यानंतर चार हजार रुपये काढण्याची सुविधा राहणार आहे.
औषध दुकानदार पूर्ववत विक्री सुरु ठेवणार
जिल्ह्यातील १८०० औषध दुकानदारांनी ग्राहकाला पूर्ववत औषध विक्री सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच टोल नाक्यावरही केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व्यवस्था राहणार आहे. पेट्रोलपंप पूर्ववत सुरू राहणार असून जनतेने कुठेही गर्दी करू नये.

Web Title: The currency runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.