सिलिंडर चोरीचा गुन्हेगार झाला नागपूरचा डॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 11:54 PM2019-10-30T23:54:24+5:302019-10-31T00:00:32+5:30

एकेकाळी सिलिंडर चोरून आपला उदरनिर्वाह करणारा संतोष आंबेकर पोलीस, कायदा आणि माध्यमांचा वापर करून शहरातील गुन्हेगारांचा डॉन झाला आहे.

Culprit of cylinder theft becomes the Dawn of Nagpur | सिलिंडर चोरीचा गुन्हेगार झाला नागपूरचा डॉन

सिलिंडर चोरीचा गुन्हेगार झाला नागपूरचा डॉन

Next
ठळक मुद्देआंबेकरचे अनेक शहरात जाळे : नेते, पोलिसांवर ठेवला वचक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकेकाळी सिलिंडर चोरून आपला उदरनिर्वाह करणारा संतोष आंबेकर पोलीस, कायदा आणि माध्यमांचा वापर करून शहरातील गुन्हेगारांचा डॉन झाला आहे. १५ दिवसांपासून आंबेकर टोळीची पाळेमुळे खोदण्याच्या कामाला लागलेल्या पोलिसांना तपासात याचा खुलासा झाला आहे.
आंबेकरला गुजरातच्या व्यापाऱ्याची पाच कोटीने फसवणूक आणि एक कोटीच्या वसुली प्रकरणात १२ नोव्हेंबरला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आंबेकर टोळीविरुद्ध तीन गुन्हे शहर आणि ग्रामीण पोलिसात दाखल झाले. पोलिसांनी आंबेकरसह आठ आरोपींना अटक केली. ते मकोका प्रकरणात १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत आंबेकरपासून लक्झरी कारसह साडेसहा कोटींची संपत्ती जप्त केली आहे. आंबेकरच्या घरातील कागदपत्रांवरून त्याच्याकडे २५ कोटीची संपत्ती असल्याचा अंदाज आहे. दोन दशकांपूर्वी आंबेकरला इतवारीत कुणीही ओळखत नव्हते. त्याने सिलिंडर चोरी करून गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवले होते. त्यावेळी ग्राहक सायकलवर सिलिंडर घेऊन गॅस एजन्सीत जात होते. आंबेकर सायकलसह सिलिंडर घेऊन फरार होत होता. त्यावेळी इतवारी सराफा बाजार आंबेकरच्या गुन्ह्याचे स्थळ होते. सराफा व्यापाऱ्यांची नस पकडण्यासाठी आंबेकरने सराफा बाजाराच्या फूटपाथवर दागिने पॉलिश करणे सुरू केले. त्याने सराफा व्यापाऱ्यांकडून हप्ता वसुली सुरू केली. सराफा बाजारात अनिल निनावेची दहशत होती. आंबेकरने १९९९ मध्ये निनावेचा खून केला. निनावेच्या खुनात डझनभरापेक्षा अधिक आरोपींचा समावेश होता. आंबेकरने तडजोड केल्यामुळे ते बचावले. खुनाच्या पहिल्याच प्रकरणात आंबेकर निर्दोष सुटला. त्यानंतर त्याची दहशत निर्माण झाली. त्याने हप्ता वसुली, ब्लॅकमेल करणे, जमीन ताब्यात घेणे सुरू केले. अडथळा आणणाऱ्यांना सुपारी देऊन हटविले. यात बिल्डर अनंता सोनी, गुन्हेगार भवानी सोनी, बाल्या गावंडेचा समावेश आहे. नोव्हेंबर २०११ च्या सुभाष साहूच्या खूनप्रकरणात त्याची भूमिका महत्त्वाची होती. परंतु पोलिसांनी ठोस पुरावा नसल्यामुळे त्याला सोडून दिले. सुभाषच्या खुनानंतर आंबेकरने संपत्ती बळकावणे, फसवणूक करणे सुरू केले. एका संपत्तीच्या वादात धमकी दिल्यामुळे त्याने बाल्या गावंडेचा खून केला होता. आंबेकरजवळ वादातीत संपत्तीचा सौदा करणे, बळकावण्यासाठी १५ ते २० जणांची टोळी आहे. आंबेकरने या मार्गाने इतवारीत १५ पेक्षा अधिक संपत्ती बळकावल्या. त्याने नागपूरशिवाय मुंबई, गोव्यात बनावट नावाने संपत्ती खरेदी केली. काही नागरिकांची ओळख झाली असून, त्यांच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई होऊ शकते.
आंबेकरची दहशत बनविण्यात आणि आर्थिक साम्राज्य वाढविण्यात नेता, पोलीस आणि कायद्यातील जाणकारांची महत्त्वाची भूमिका आहे. ३० पेक्षा अधिक प्रकरणे तसेच चार मकोका कारवायानंतरही तो अधिक काळ तुरुंगात राहिला नाही. दोन मकोकात तो निर्दोष सुटला. एका कारवाईत आश्चर्यकारकपणे त्याने मुंबईत मंत्रालयातून दिलासा मिळविला तर एक प्रकरण न्यायालयात सुरु आहे. तो पीडित व्यक्तीला सोशल मीडियावर आपले स्टेटस दाखवून भयभीत करीत होता. त्याने सोशल मीडियासाठी तज्ज्ञांची नियुक्ती केली होती. तो नेहमीच नेत्यांच्या संपर्कात राहत होता. पोलीस तपासात त्याचे पुरावे आढळले आहेत. जाणकारांच्या मते मदत करणाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय आंबेकरचा सफाया केल्या जाऊ शकत नाही.

अनेक संपत्तीत भागीदारी
आंबेकर अनेक वर्षांपासून संपत्ती तसेच गुन्हेगारी जगतात न्याय निवाडा करीत होता. शहरातील अनेक मोठ्या संपत्तीच्या खरेदी-विक्रीत त्याची महत्त्वाची भूमिका होती. जानेवारी २०११ मध्ये अनंता सोनी खून संपत्तीच्या वादातून झाला होता. आंबेकरने अनंताला घरी बोलावून धमकी दिली होती. कळमना पोलीस आरोपीचा शोध घेऊ न शकल्याने तपास सीआयडीकडे देण्यात आला. सीआयडीलाही खुनातील आरोपी मिळाले नाहीत.

बंगला करणार जमीनदोस्त
पोलीस आंबेकरचा इतवारी येथील बंगला जमीनदोस्त करणार आहेत. या संदर्भात महापालिका आणि नासुप्रशी संपर्क साधण्यात येणार आहे. आंबेकरने चार व्यक्तींकडून जमीन खरेदी करून हा बंगला तयार केला आहे. विना परवानगी बांधकाम केले. त्याच्यावर कारवाई न करणे हे ही गुन्हेगाराची मदत करणे आहे. त्यामुळे त्याचा बंगला पाडण्यात येणार आहे.

Web Title: Culprit of cylinder theft becomes the Dawn of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.