‘सीएसआयआर’ची भरती प्रक्रिया केंद्रीकृत करणार
By Admin | Updated: August 19, 2016 02:46 IST2016-08-19T02:46:37+5:302016-08-19T02:46:37+5:30
भारत सरकारच्या वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद नवी दिल्लीच्या (सीएसआयआर) अखत्यारीतील ...

‘सीएसआयआर’ची भरती प्रक्रिया केंद्रीकृत करणार
सतीश वटे यांचे प्रतिपादन : वनराई फाऊंडेशनतर्फे भावपूर्ण सत्कार
नागपूर : भारत सरकारच्या वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद नवी दिल्लीच्या (सीएसआयआर) अखत्यारीतील ३८ प्रयोगशाळांचे कामकाज प्रभावी होण्यासाठी त्यात ‘टॅलेंट’ असलेल्या वैज्ञानिकांची भरती करणे गरजेचे आहे. त्यासाठी २०१८ पर्यंत ‘सीएसआयआर’ची भरती प्रक्रिया केंद्रीकृत करणार असल्याचे प्रतिपादन नीरीचे माजी संचालक आणि ‘सीएसआयआर’च्या भरती व मूल्यांकन बोर्डाचे अध्यक्ष डॉ. सतीश वटे यांनी केले.
नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सीएसआयआर’या संस्थेच्या भरती व मूल्यांकन बोर्डाच्या अध्यक्षस्थानी नियुक्ती केली. या नियुक्तीबद्दल वनराई फाऊंडेशनच्यावतीने शंकरनगर चौकातील राष्ट्रभाषा संकुलातील शंकरराव देव संवाद कक्षात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे अतिरिक्त महासंचालक आर. के. चौबे, विधान परिषदेचे आमदार गिरीश व्यास, वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, अध्यक्ष अनंत घारड, सचिव अजय पाटील, कार्यकारी अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यांच्या हस्ते डॉ. सतीश वटे आणि माधवी वटे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. वटे म्हणाले, नीरीचा संचालक झाल्यानंतर वनराईनेच माझा पहिला सत्कार केला होता. ‘सीएसआयआर’ सारख्या संस्थेचा अध्यक्ष होणे ही मोठी जबाबदारी आहे. कुटुंबाच्या सहकार्याशिवाय कोणतेही यश मिळविणे अशक्य होते. योग्य व्यक्तीने योग्य काम केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम मिळत असल्यामुळे ‘सीएसआयआर’च्या भरतीत नवे टॅलेंट आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आर. के. चौबे म्हणाले, पर्यावरणाच्या क्षेत्रात डॉ. सतीश वटे यांचे कार्य मोलाचे आहे. भविष्यात नवी जबाबदारीही ते सक्षमपणे पार पाडतील.
डॉ. वटे यांची नियुक्ती ‘सीएसआयआर’सारख्या संस्थेवर झाल्यामुळे हा नागपूरचा गौरव असल्याचा उल्लेख त्यांनी केला. आमदार गिरीश व्यास यांनी डॉ. वटे यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगून नागपूरकरांना एकेक संधी उपलब्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रास्ताविकातून डॉ. गिरीश गांधी यांनी डॉ. सतीश वटे यांनी विद्यार्थी जीवनापासून नागपूरची प्रतिष्ठा वाढविली असून स्वत: पंतप्रधानांनी त्यांची नियुक्ती केल्यामुळे ही नागपूरसाठी गौरवाची बाब असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. नितीन जतकर यांनी डॉ. सतीश वटे यांचा परिचय करून दिला. संचालन अजय पाटील यांनी केले. आभार प्रशांत वासाडे यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)